सरयू किनारी केली आरती : प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच अयोध्येत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयाध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी अयोध्येत पोहोचल्या. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेण्याबरोबरच आरतीलाही उपस्थिती दर्शवली. त्यांनी कुबेर टिळा येथे जाऊन शिवमंदिरात पूजाही केली. राष्ट्रपतींनी आपल्या या पूर्वनियोजित अयोध्या दौऱ्यात हनुमानगढी आणि सरयू किनारी आरती केली. त्यांच्या आगमनापूर्वी राम नगरीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
प्राणप्रतिष्ठेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्येत पोहोचल्यामुळे पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती कार्यालयाच्या एक विशेष पथक अयोध्येत पोहोचले होते. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. विमानतळावरून रस्तामार्गाने राष्ट्रपती अयोध्येत पोहोचल्यानंतर सुरुवातीला हनुमानगढी येथे गेल्या. दुपारी 4.50 वाजता त्या तेथील आरतीत सहभागी झाल्या. यानंतर सायंकाळी 5.45 च्या सुमारास सरयू नदीकिनारी पूजा आणि आरती केली. तेथून रामजन्मभूमीवर पोहोचल्यानंतर संध्याकाळी 6.45 वाजता त्या रामलल्लाच्या दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. तेथील आरतीनंतर सायंकाळी 7.15 वाजता कुबेर टिळा येथे भेट देऊन त्या विमानतळावरून नवी दिल्लीला रवाना झाल्या. त्यांच्या या भेटीदरम्यान विमानतळापासून अयोध्या धामपर्यंत प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस व प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिसांसोबतच सीआरपीएफ, आरएएफ, एटीएस आणि पीएसीचे जवानही ठिकठिकाणी तैनात होते.









