नंदगड/वार्ताहर
बुधवारी अवकाळी पावसामुळे कापलेले भातपीक पाण्याखाली गेले. त्यामुळे खानापूर तालुक्यातील गावोगावातील शेतवडीतील भातपीक पूर्णत: भिजले होते. नुकसानीला सामोरे जावे लागणार, अशी चिंता शेतकऱ्यांत होती. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शनिवारी बहुतेक भागातील भिजलेले भातपीक एकत्रित करून मळणी करण्याची धांदल सर्वत्र सुरू झाली होती. तर काही ठिकाणी भात एकत्रित करण्याचे काम सुरू होते त्या ठिकाणी रविवारी मळणी करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील कापोली, गुंजी, लोंढा, नागरगाळी, हलशी, नंदगड, बेकवाड, बिडी, मंग्यानकोप, कक्केरी, गोधोळी, भुरूणक्की, इटगी, पारिश्वाड, गंदिगवाड, चापगाव, लालवाडी, लोकोळी, गर्लगुंजी, इदलहोंड, रामगुरवाडी, खानापूर, निलावडे, नेरसा, जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा आदी भागात भात पीक घेतले जाते. सर्वच गावातील शेतवडीत भातपीक कापण्याचे काम सुरू आहे. शेतकरीवर्ग व शेतमजूर भात कापणीच्या कामात व्यस्त आहेत. माळरानावरील व पाणथळ जमिनीतील भातपीक कापण्यासाठी आले आहे. भात कापणी जोरात सुरू आहे. असे असताना बुधवारी पाऊस पडला. यामुळे कापलेले भातपीक पाण्याखाली गेले होते. पावसामुळे ऊसतोडणी व वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. दोन दिवस पाऊस थांबल्याने पुन्हा ऊस उचल पूर्ववत सुरू झाली आहे.









