मागील काही काळापासून मणिपूर हिंसेवरून चर्चेत आहे. परंतु या राज्यात अशा अनेक अनोख्या प्रथा अन् परंपरा आहेत, ज्या अत्यंत आकर्षक अन् येथील समृद्ध समाज दर्शविणाऱ्या आहेत. अशीच एक परंपरा येथे विवाह सोहळ्यावेळी पार पाडली जाते. एका परंपरेच्या अंतर्गत वधू अन् वराच्या हातून जिवंत माशांना पाण्यात सोडले जाते. या परंपरेचे नाव नगा-थबा असून यात मंडपामध्ये विवाहाचे विधी सुरू असताना वराच्या वतीने दोन महिला तर वधूच्या वतीने एक महिला या शुभ प्रथेमध्ये भाग घेत असते. ही परंपरा वर-वधूच्या भावी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. हा विधी तीन महिलांकडून दोन जिवंत माशांना पाण्यात सोडण्यासाठी नेण्यापासून सुरु होतो.
मासा ‘नगामू’ किंवा चन्ना ओरिएंटलिसच्या छोट्या प्रजातीचा असावा असे सांगण्यात येते. माशांना वधूच्या घरातील ‘लाई-निंगथो’ खोलीत ठेवले जाते (मैतेई समुदायाच्या मुख्य देवतेची पूजा केली जाणारी खोली). ही खोली नेहमीच मैतेईच्या घरातील दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असते. कोंडम किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यावर नगामू अंकित असतो. माशांची संख्या 5-10 दरम्यान असू शकते आणि सर्वात मजबूत अन् सर्वात सक्रीय माशांची निवड करणे हे महिलांचे कर्तव्य मानले जाते. निवड झाल्यावर दोन महिला प्रत्येकी एक नगामू पकडतात आणि कंदिल पडकलेल्या तिसऱ्या महिलेच्या नेतृत्वात नजीकच्या जलाशयाच्या दिशेने चालू लागतात. तेथे पोहोचल्यावर या माशांना पाण्यात सोडले जाते.









