तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी पार्टी करण्यास गेलात किंवा नातेवाईकाला भेटण्यास त्याच्या घरी गेला आणि त्याने तुम्हाला खाण्यास काहीच दिले नाही तर काय विचार कराल. तसेच तुम्ही तेथे असताना तो आणि त्याचा कुटुंब तुम्हाला जेवण्याबद्दल न विचारता स्वत: जेवून घेत असेल तर तुम्ही निश्चितच रागावाल. भारतीय म्हणून हे वर्तन अत्यंत खराब आणि अशिष्ट वाटेल. परंतु स्वीडनमध्ये अशाप्रकारच्या वर्तनाची तुम्हाला सवय लावून घ्यावी लागते, कारण तेथील लोकांसाठी ही सामान्य बाब आहे.
स्वीडनमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना जेवू घालण्याची प्रथा नाही. येथे ते तुम्ही काही खाणार का असे विचारतच नाहीत. जर कुणी स्वत:हून खाण्यासाठी काहीतरी मागत असेल तरच ते देत असतात. जर आमच्या घरात मुलामुलींचे मित्र केवळ खेळण्यासाठी येत असतील तर आम्ही इतरांच्या मुलांना अखेर का जेवू घालावे? परंतु ते जर रात्री आमच्याकडेच थांबणार असतील तर अवश्य जेवू घालू असे स्वीडनच्या लोकांचे म्हणणे आहे. स्वीडनच्या लोकांच्या या भूमिकेनंतर अनेक भारतीयांनी पोस्ट करत भारतात जर कुणी घरी आले तर त्याला उपाशीपोटी परत पाठविले जात नसल्याचे म्हटले आहे. स्वीडनमध्ये अखेर अशी परंपरा का असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. हे केवळ स्वीडनमध्ये नव्हे तर अन्य नॉर्डिक देशांमध्येही घडते. यात स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड, आइसलंड आणि नॉर्वे यांचा समावेश होता. नॉर्डिक प्रथेनुसार जुन्या काळात आदरातिथ्य करणे केवळ श्रीमंत लोकांना शक्य असायचे, परंतु ते ज्यांचे आदरातिथ्य करायचे ते गरजू किंवा गरीब लोक असायचे, अशा स्थितीत श्रीमंतच गरीबांना जेवू घालत होते. तेव्हापासून जर कुणाला जेवू घालायची वेळ येणे म्हणजे संबंधितासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे मानले जाते. याचमुळे आजही या परंपरेचे पालन केले जाते. इतरांना जेवू घालून समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब असल्याचे दाखवून देऊ इच्छित नाही.