आंतरराष्ट्रीय योगदिनाचे नेतृत्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संयुक्त राष्ट्रसंघात उद्गार
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
‘साऱ्या जगाला एकत्र करण्याचे सामर्थ्य योगात आहे. भारताने जगाला दिलेली योगविद्या सर्वांसाठी आहे. या विद्येवर कोणाचाही बौद्धिक अगर कोणत्याही प्रकारचा अधिकार नसून ही विद्या सहज, सुलभ आणि वैश्विक आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी बुधवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी योगविद्येची महती आणि जागतिक उपयुक्तता स्पष्ट करणारे भाषणही जगाला उद्देशून केले.
त्यांच्या अमेरिका दौऱ्याला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मंगळवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणत: साडेदहा वाजता त्यांचे न्यूयॉर्क येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या कार्यक्रमात भाग घेतला. बुधवारी जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली. भारत हे गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक स्थान असल्याचा निर्वाळा मस्क यांनी दिला. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फॅन’ असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी त्यांच्या विख्यात ‘टेस्ला’ कारची निर्मिती करण्याचे केंद्र भारतात स्थापन केले जाईल, असा शब्द दिला. हे केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करायचे, या संबंधातील निर्णय या वर्षअखेर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुट्रेस यांचा संदेश
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनिओ गुट्रेस यांनी महत्वाचा संदेश दिला आहे. योगविद्या साऱ्या जगासाठी उपयुक्त असून आरोग्य आणि स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी तिची आवश्यकता आहे. ही भारताने जगाला दिलेली दिव्य देणगी आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली. योगा केवळ मन आणि शरीर यांच्यासाठीच उपयुक्त आहे असे नव्हे, तर जगातील कोट्यावधी लोकांना त्याने एकमेकांशी जोडले आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

असाही एक विश्वविक्रम
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेचे अध्यक्ष क्साबा कोरोसी, तेथील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडॅम्स यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यानंतर योगव्यायामाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात 180 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. हा आंतरराष्ट्रीय विक्रम असून तो गिनीज विक्रम पुस्तिकेत नोंद करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध आणि पारितोषक विजेते कथाकथनकार जय शेट्टी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाककर्ते (शेफ) विकास खन्ना, ग्रॅमी पुरस्कार विजेती रिकी केज, आंतरराष्ट्रीय गायिका मेरी मिलबेन, अभिनेता रिचर्ड गेरे आणि 180 देशांचे संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.

मान्यवरांकडून योगमाहात्म्य
या प्रसंगी क्साबा कोरोसी यांनीही योगाचे महत्व विशद केले. योगविद्येमुळे केवळ शरीसस्वास्थ्याचाच लाभ होतो असे नव्हे, तर मन आणि बुद्धीही एका उच्च पातळीवर पोहचतात. आज जगाला समतोल आणि स्वयंनियंत्रण यांची अतिशय आवश्यकता आहे. ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य योगात आहे. त्यामुळे सर्वांनी ही विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. 9 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच आंतरराष्ट्रीय योगदिनाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, याची आठवण रुचिका कंबोज यांनी करुन दिली.
गांधींजींना अभिवादन
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रांगणात स्थापित गांधीजींच्या पुतळ्याला पंतप्रधान मोदी यांनी अभिवादन केले. यावेळी तेथे उपस्थित भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांनी त्यांचा जयजयकार केला. या कार्यव्र्रमानंतर योगासनांच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम साधारणत: 1 तास चालला.
पर्यटन परिषदेतही भाषण
पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना येथे गोव्यात जी-20 समुदायाच्या पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेला त्यांनी न्यूयॉर्कमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. आपल्या देशात येणाऱ्यांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही आमची संस्कृती आहे, असे स्पष्ट करतानाच, त्यांनी ‘अद्वितीय भारत’ किंवा इनक्रिडिबल इंडिया या तत्वाचा पुन्हा उच्चार केला. या परिषदेच्या निमित्ताने विविध देशांच्या पर्यटन मंत्र्यांना स्वत:च पर्यटक बनण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादनही केले.
आज महत्वाचा दिवस
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज गुरुवारचा दिवसही महत्वाचा आहे. गुरुवारी ते अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करणार आहे. असे भाषण दोनदा करण्याची संधी मिळालेल्या काही मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी त्यांच्यासाठी शाही भोजनाचे आयोजन केले आहे. बायडेन यांच्याशी त्यांची विस्तृत चर्चाही होणार आहे. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण, उद्योग आणि अर्थ आदी क्षेत्रात महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे.









