वाळपई भागात 15 तास वीजपुरवठा खंडित, दाबोस पाणी प्रकल्पावर पुन्हा परिणाम, आज-उद्या पाणी टंचाईची शक्यता
वाळपई : खंडित वीज पुरवठ्याची समस्या वाळपई व ग्रामीण भागाला सतावू लागली आहे. गेल्या एक महिन्यापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागलेला आहे. याचा विपरीत परिणाम सत्तरी तालुक्याच्या पाणीपुरवठ्यावर होताना दिसत आहे. फणसवाडी-नावेली येथे वीज वाहिन्या तुटल्यामुळे गेल्या 24 तासात 15 तास वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. यामुळे दाबोस पाणी प्रकल्पावर याचा परिणाम झाला असून पुढील दोन दिवस सत्तरी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वाळपईच्या वीज कार्यालयाने सत्तरी तालुक्याच्या अनेक ठिकाणी रविवारी शट डाऊन केले होते. वीज वाहिन्यांचे दुऊस्ती व अत्यावश्यक दुऊस्तीची गरज असलेल्या ठिकाणी काम करण्यासाठी रविवारी सकाळी 8 वाजता खंडित केलेला वीजपुरवठी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाला. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाला. यामुळे 15 तास वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार फणसवाडी न्हावेली येथे रस्त्याचे ऊंदीकरण सुरू आहे. यावेळी वीज खांबाच्या जवळ रस्ता ऊंदीकरणासाठी खोदकाम केल्याने रविवारी मध्यरात्री अनेक खांब आडवे झाले व 33 के व्ही. क्षमतेच्या वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
तरीही 15 तास वीजपुरवठा खंडित
सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वीज वाहिन्या दुऊस्तीचे काम हाती घेतले. मात्र सदर वीज वाहिनी ही जास्त क्षमतेची असल्यामुळे दुऊस्तीचे काम पूर्ण होण्यास बराच विलंब लागला. जवळपास सहा खांब मोडले होते. अनेक तारा तुटल्या होत्या. यामुळे सोमवारी दिवसभर दुऊस्तीचे काम हाती घेतले. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.
दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा बंद
दरम्यान रविवारी शट डाऊन केल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्प बंद पडला. संध्याकाळी 5 वा. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही तासासाठी प्रकल्प चालू केला होता. मात्र मध्यरात्री उशिरा पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे प्रकल्पाची यंत्रणा बंद पडली. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून खंडित झालेला वीज पुरवठा संध्याकाळी 5 वाजता सुरळीत झाल्यानंतर प्रकल्प सुरू केला. पाणी प्रकल्पाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किमान 24 तास लागतात. यामुळे सत्तरी तालुका वाळपई विभाग व ग्रामीण भागामध्ये मंगळवारी व बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुकानदारांचे नुकसान
दरम्यान खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसलेला आहे. आठ दिवसापूर्वी 21 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पुन्हा एकदा काल 15 तास वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे वाळपई शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदारांना आर्थिक फटका बसला आहे. सरकारचे वीज खात्यावर लक्ष नाही. हल्लीच्या काळामध्ये वाळपई भागांमध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होऊ लागलेला आहे. सरकार याकडे लक्ष देणार का ? असा सवाल आता दुकानदारांनी केला आहे.









