पाकिस्तानातील मॉल्स आणि मोठमोठय़ा व्यापारी आस्थापनांना रात्री साडेआठपर्यंत टाळे ठोकण्याचे आदेश शरीफ सरकारने दिले आहेत. पाकिस्तानच्या विदेशी गंगाजळीत आता केवळ 11.7 अब्ज डॉलर्स शिल्लक राहिलेले असून एका महिन्याचे इंधन खरेदी करण्यापुरते हे विदेशी चलन उपयुक्त ठरणार आहे. रशिया आणि युपेन युद्धाचा परिणाम म्हणून युरोपात हिवाळय़ाच्या गारठय़ात वीज गुल होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, वीज गुल झाली पाकिस्तानची.
पाकिस्तानातील बहुतांश वीजप्रकल्प विदेशातून आयात होणाऱया कच्च्या तेलावर व नैसर्गिक वायूचा वापर करत असल्याने त्यासाठी भरपूर विदेशी चलनाची गरज असते. सध्या पाकिस्तानच्या तिजोरीत केवळ महिनाभराचे इंधन आणि अत्यावश्यक वस्तू खरीदण्यासाठी लागणारे विदेशी चलन शिल्लक आहे. कच्च्या इंधन तेलाच्या दरात गेल्यावषी भरमसाट वाढ झाल्याने पाकिस्तानची 50 टक्के विदेशी चलन गंगाजळी खाली आली. त्यासाठी आता पाकिस्तान सरकारने देशभरातील व्यापारी आणि सरकारी आस्थापनांना वीज कपातीसाठी विविध प्रकारच्या बंधनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्तीचे आदेश जारी केले आहेत. यात मोठमोठय़ा शहरातील मॉल्सना रात्री 8.30 वाजता काम आटोपते घेण्यास सांगितले आहे तर सरकारी कार्यालयांना 30 टक्के वीज कपात करण्याची सक्ती केलेली आहे. या उपायांमुळे महिन्यासाठी 27.43 कोटी डॉलर्सची बचत होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. गेली कित्येक दशके अरब राष्ट्रांकडून मोठय़ा प्रमाणात मिळत असलेला निधी गेल्या काही वर्षात बंद झाल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांची पंचाईत झालेली आहे. काश्मीर प्रश्नाचा बाऊ करून सहानुभूती मिळवत सौदी अरेबियासहीत अन्य आखाती देशांकडून निधी उकळत असत. सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी तर पाकिस्तानी पंतप्रधानांना उंबरठय़ावरच ठेवलेले आहे. तसेच आर्थिक मदत बंद करून आता केवळ कर्ज देण्याचे धोरण सौदी अरेबिया सरकारने ठरविलेले आहे. संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानसाठी आपले दरवाजे बंद ठेवलेले आहेत.
संयुक्त अरब अमिराती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फिदा झाल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जाते. अरब राष्ट्रांबरोबरच पाकिस्तानचा मोठा निधी आणि शस्त्र पुरवठादार अमेरिका कायमचाच दुखावलेला आहे. गेल्या दोन दशकांपासून या दोन्ही देशांचे संबंध बिघडल्याने पाकिस्तान पुरता हादरून गेलेला आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार ढेपाळलेली आहे.
चीनबरोबर केलेल्या दोस्तीमुळे अमेरिकेसारखा देश पाकिस्तानपासून दूर गेलेला आहे. तर चिनी धोरणाने पाकिस्तानला कर्जबाजारी करून ठेवले आहे. चीनकडून घेतलेली कर्जे फेडणे पाकिस्तानला शक्मय होत नाही. त्यासाठीच पाकिस्तानवर आज कर्जबाजारीपणाचा ठपका बसलेला आहे. श्रीलंका, बांगलादेश यांच्यानंतर पाकिस्तान कर्जबाजारी झालेला आहे. यासाठीच देशातील मॉल्स रात्री 8.30 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. या अशा निर्णयामुळे पाकिस्तानमधील उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होणार आहे.
पाकिस्तानचा उदय झाल्यापासून या देशात आर्थिक भरभराटीचा काळ कधी आलाच नाही. भारताचा काश्मीरप्रश्नी काटा काढण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा आश्रय घेतला. दहशतवादाचा हा भस्मासूर या देशाची छबी काळवंडून गेलेला आहे. संपूर्ण जगात या देशाची ओळख दहशतवादाची भूमी म्हणूनच झालेली आहे. त्यामुळे युरोपियन देशांच्या संघटनेकडून पाकिस्तानला निधी पुरविण्यास विरोध होत असतो. 2019 साली पाकिस्तानला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी सहा अब्ज डॉलर्सचा पतपुरवठा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केला होता.
गेल्या वषी ऑगस्ट महिन्यात 1.1 अब्ज डॉलर्सचा निधी नाणेनिधीने दिलेला आहे. सध्या शरीफ सरकार आणखीन 1.1 अब्जांचा निधी पदरात घेण्यासाठी धडपडत आहे. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानमध्ये आलेल्या अस्मानी महापुरामुळे शरीफ सरकारचे कंबरडे मोडून पडलेले आहे.
विदेशी गंगाजळीच्या अभावी श्रीलंका आणि बांगलादेशात असंतोष पसरलेला आहे. आता वीज कपातीवरून पाकिस्तानमध्ये त्याचा फैलाव झालेला आहे. हे सर्व देश चिनी आर्थिक धोरणाचे खंदे समर्थक बनलेले असून ते आता दिवाळखोरीकडे चाललेले आहेत. चीन या देशांना आणखीन कर्ज देण्याच्या नावाने आपल्या देशात सडत पडलेली संयंत्रे देत आहे. अशाच प्रकारच्या दोन रेल्वेगाडय़ा पाकिस्तानच्या गळय़ात मारलेल्या आहेत. या न चालणाऱया रेल्वे गाडय़ांमुळे देशात वादंग उठलेले आहे. असे असतानाच वीज कपातीने पाकिस्तानात हाहाकार उडालेला आहे.
– प्रशांत कामत








