कराड बसस्थानक प्रवेशद्वारातील खड्ड्यांमुळे प्रवाश्यांना धोक्याची परिस्थिती
कराड : कराड बसस्थानकाच्या प्रवेशव्दाराची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. बसस्थानकात जाणाऱ्या बस या खड्यात आदळत असल्याने चालक व वाहकांबरोबरच प्रवाशांचेही मणके ढिले होत आहेत. त्यातच पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने चालकाला खड्याचा अंदाज येत नाही. खड्यात जोराने बस आदळल्यानंतर अनेकदा बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापतीचा सामना करावा लागत आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नावलौकिक मिळवलेल्या कराड बसस्थानकाची प्रवेशद्वाराच्या दुरवस्थेमुळे कळा जात आहे. नवग्रह मंदिरासमोरील बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून सर्व बस स्थानकात प्रवेश करतात. या प्रवेशद्वारात अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. चालक व प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर या खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती.
मात्र वारंवार बस जाऊन खड्ड्यातील मुरूम निघाला असून येथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. बाहेरच्या आगाराच्या बसचालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने बस खड्यात आदळत आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांनाही दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. बसचेही नुकसान होत असल्याने पालिका अथवा एस. टी. प्रशासनाने डांबराच्या सहाय्याने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. बसस्थानकाकडे येणाऱ्या कब्रस्थानमधील संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता नगरपालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम केले नसल्याने बसचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.








