महापालिकेतील स्थिती : तब्बल 12 वर्षापासून पद रिक्त : प्रभारींवर महत्वाच्या विभागाचा कारभार, ‘प्रभारी’ही पद घेण्यास कोणी पुढे येईना
विनोद सावंत कोल्हापूर
महापालिकेमध्ये तब्बल 12 वर्षापासून आरोग्याधिकारी पद रिक्त आहे. कामाच्या सोयीसाठी प्रशासनाने नियुक्त केलेले प्रभारी अधिकारीही निवृत्त झाले तरी शासनाकडून मनपामध्ये आरोग्याधिकारींची नियुक्त केलेली नाही. आरोग्या सारख्या महत्वाची सेवा असतानाही या विभागाचा कारभारच ‘प्रभारीं’वर दिला जात आहे.
कोल्हापूर महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था असून शहरातील नागरीकांना पायाभूत सुविधा देण्याचे काम करत आहे. यामध्ये रस्ते, गटारी, ड्रेनेजलाईन, प्राथमिक शिक्षणासह आरोग्याच्याही सुविधा दिली जाते. महापालिकेचे 11 आरोग्य केंद्र, तीन हॉस्पिटल आहेत. रूग्णांना अल्प दरात आरोग्य सेवा दिली जाते. सर्वसामान्य रूग्णांसाठी मनपाचे आरोग्य सेवा आधारवड आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी आरोग्याधिकाऱ्यांकडे असून हे पद शासननियुक्त आहे. मात्र, 12 वर्षापासून शासनाने या पदावर आरोग्याधिकारी नियुक्त केलेला नाही. यामुळे महापालिका प्रशासनाने आपल्याकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या पदाचा प्रभारी चार्ज दिला आहे. वास्तविक आरोग्या विभाग हा महत्वाचा विभाग आहे. या ठिकाणी कोणतीही कसूर चालत नाही. साथीचे आजारावेळी योग्य उपाय योजना करणे आवश्यक असते. असे असतानाही राज्य शासनाकडून या पदावर कायमस्वरूपी अधिकारी दिलेला नाही. 12 वर्षामध्ये ठोकमानधन आणि मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हे पद दिले गेले. कोरोना सारख्या महामारीमध्येही राज्यशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मनपातील प्रभारी आरोग्याधिकाऱ्यांनीच ही गंभीर परिस्थिती हाताळली.
सरळसेवेतून पद भरण्याचा पर्याय
तब्बल 12 वर्ष राज्यशासनाकडून आरोग्याधिकारी मिळाला नसल्याने मनपा प्रशासनाने आता सरळसेवेतून या पदाची भरती करणार आहे. राज्यशासनाने तशी परवानगीही दिली आहे. मात्र, सरळसेवेतून तरी या पदावर कोण येणार का हे पाहणे औत्स्कयाचे आहे.
आतापर्यंत डझनभर प्रभारी आरोग्याधिकारी
महापालिकेमध्ये 2010 पासून आतापर्यंत डझनभर प्रभारी आरोग्याधिकारी झाले आहेत. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कोणी येत नसल्याने मनपामध्ये असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रभारी म्हणुन या विभागचा कारभार दिला आहे. तसेच ठोकमानधनावरही काही अधिकाऱ्यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
पात्रता नसतानाही पदभार
कामाच्या सोयीसाठी पात्रता नसतानाही महापालिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गळ्यात आरोग्याधिकारी या पदाची माळ घातली जात आहे. वरीष्ठांच्या आदेशामुळे वैद्यकीय अधिकारीही दिलेली जबाबदारी पार पडत आहेत.
आरोग्याधिकारी नको रे बाबा
गेल्या तीन चार वर्षापासून आरोग्याधिकारी हे पद घेण्यास कोणाही तयार होत नाही. इच्छेविरोधातच या पदाचा कार्यभार घेतला गेला. डॉ. रमेश जाधव निवृत्ती झाल्यानंतर डॉ. प्रकाश पावरा यांच्याकडे पदभार दिला आहे. त्यांनीही मनपा प्रशासना या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे पत्र दिले आहे. सेवा ज्येष्ठेतेनुसार असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांची सुद्धा हीच भूमीका आहे.
लोकप्रतिनिधींची डोकेदुखी कळीचा मुद्दा
आरोग्याधिकारी यांच्याकडे केवळ मनपा हॉस्पिटलची नव्हे तर घनकचरा व्यवस्थापनाचीही जबाबदारी आहे. वास्तविक आरोग्याधिकाऱ्यांकडे केवळ हॉस्पिटलची जबाबदारी देण्याचे राज्यशासनाचे आदेश आहेत. मात्र, याची अंमलबजावणी मनपात होत नाही. कचरा उठावामध्ये काही चुका झाल्यास लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्याधिकारीपदाचा कारभार कोणी घेण्यास इच्छुक नाहीत.
आरोग्याधिकारीसाठी पात्रता
एमबीबीएस व प्रिव्हींटीव्ह सोशल मिडीसन (एमडीपीएसएमएल) किंवा डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ (डीपीएच)