इस्रोचे प्रतिपादन : चंद्राचा उपयोग अंतराळ प्रवासाचे स्थानक म्हणून होणार : जगभरातून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था /बेंगळूर
भारताने पाठविलेली चंद्रबग्गी (रोव्हर) ‘प्रग्यान’चे कार्यायुष्य चंद्रावरील एका दिवसाएवढे, अर्थात पृथ्वीवरील 14 दिवसांएवढे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, ही कालमर्यादा वाढू शकते, असा संकेत इस्रोने दिला आहे. आणखी 14 दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होणार आहे. त्यामुळे प्रग्यानला ऊर्जा मिळणार नाही. परिणामी तो थांबणार, असे प्रारंभी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी इस्रोने दिलेल्या निवेदनानुसार हे आयुष्य वाढण्याचीही शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र सुरु झाल्यानंतर पुढचे चौदा दिवस प्रग्यान काम थांबवणार आहे. मात्र नंतर पुन्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचा दिवस सुरु झाल्यानंतर तो पुन्हा कार्यरत होऊ शकतो. त्याच्यावर पृथ्वीवरुन नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असे इस्रोच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पुढे काय घडणार
विक्रम या चांद्रवाहनाचे चंद्रावर यशस्वी अवतरण झाल्यानंतर पुढे काय होणार याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रावरील पाणी, तेथील माती, खडक आणि खनिजे यांच्या संरचनेचा अभ्यास विक्रम वाहन आणि प्रग्यानकडून केला जाणार आहे. ही कार्ये त्यांना सध्याच्या समयपत्रिकेनुसार पृथ्वीवरच्या चौदा दिवसांमध्ये करावी लागणार आहेत. ही माहिती वेळोवेळी त्यांच्याकडून पृथ्वीवर पाठविली जाणार आहे.
ऊर्जा मिळत असेपर्यंतच…
यापुढचे चौदा पृथ्वीदिन चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर प्रकाश असेल. तथापि, त्यानंतर सौरऊर्जेचा पुरवठा बंद होईल. त्यामुळे त्यांना 14 दिवसांचाच कालावधी आहे. तथापि, त्यानंतरही ते कार्यरत राहू शकतात. तशी व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र यासंदर्भात आणखी दोन आठवड्यांनंतरच निर्णय घेतला जाणार आहे.
अनेक उपकरणे समाविष्ट
वाहन आणि बग्गीत अनेक अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्यात लेसरयुक्त ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप हे महत्वाचे साधन आहे. या साधनाच्या साहाय्याने चंद्रावरील खडक, माती, पाणी यांचे रासायनिक पृथ्थकरण केले जाईल आणि ती माहिती पृथ्वीवर पाठविण्यात येईल. त्यातून चंद्रावर कोणती खनिजे सापडू शकतात, याचे अनुमान मिळू शकते, असे प्रतिपादन इस्रोकडून करण्यात आले.
भारतासाठी संधींचे महाद्वार
यशस्वी चांद्रअभियान हे भारतासाठी संधींचे महाद्वार उघडणारे ठरणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारताचे महत्व वाढणार असून चंद्र हा भारताच्या भविष्यकालीन अंतराळ अभियानासाठी स्थानक ठरु शकतो, असे प्रतिपादन इस्रोचे माजी अध्यक्ष कस्तुरीरंगन यांनी केले. भारताची ही कामगिरी वैशिष्ट्यापूर्ण असून तिचा लाभ भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्राच्या या भागात पाणी मोठ्या प्रमाणावर सापडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. प्रग्यानकडून पाठविल्या गेलेल्या माहितीमुळे चंद्राविषयीच्या ज्ञानात मोठी भर पडणार असून या अभियानाचे आर्थिक लाभही मिळतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ममता बॅनर्जींवर ‘मीम्स’चा पाऊस
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इस्रोचे अभिनंदन करताना अनवधानाने काही चुका केल्याने तो सोशल मिडियावर विनोदाचा विषय झाला आहे. इस्रोचे कौतुक करताना त्यांनी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या 80 च्या दशकातील अंतराळ प्रवासाठी आठवण करुन दिली. तथापि, त्यांनी नाव घेताना राकेश शर्माऐवजी राकेश रोशन असे घेतले. तसेच रापेश रोशन अनेक वर्षांपूर्वी चंद्रावर पोहचले होते, असेही विधान त्यांनी केले. वास्तविक शर्मा यांनी केवळ अंतराळ प्रवास केला होता. ते चंद्रावर पोहचले नव्हते. त्यांच्या या दोन चुकांमुळे नेटकऱ्यांनी त्यांना बरेच ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.
आम्ही, पूर्वीच चंद्रावर पोहचलो आहोत…
चंद्रावर यान पाठविले म्हणून भारताने टेंभा मिरवू नये. कारण आम्ही पाकिस्तानी लोक चंद्रवर कितीतरी पूर्वीच पोहचलो आहोत, अशी विचित्र भासणारी प्रतिक्रिया एका पाकिस्तानी युवकाने तेथीलच एका वृत्तवाहिनीला दिली आहे. आपण असे कसे म्हणता या प्रश्नावर त्याने जे उत्तर दिले त्याने अक्षरश: हास्याचा स्फोट झाला आहे. पहा ना, चंद्रावर पाणी नाही, पाकिस्तानाही पाणी नाही. चंद्रावर अन्न नाही, पाकिस्तानाही ते नाही, चंद्रावर साखर, इंधनवायू, पेट्रोल काहीही नाही, येथेही ते नाही. मग आम्ही चंद्रावर आहोत नाहीतर कोठे आहोत, असे हा युवक म्हणताना दिसून येतो. त्याच्या या म्हणण्यावरही हास्यस्फोटक प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास प्रारंभ झाला आहे. अनेकांनी त्याचे प्रामाणिकपणामुळे अभिनंदन केले.









