जातनिहाय जनगणनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन : सांबरा विमानतळावर पत्रकारांशी साधला संवाद
बेळगाव : केवळ मुसलमान किंवा मागासवर्गीय यांनाच नव्हे तर सर्व जाती-धर्मातील गरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे. सामाजिक, आर्थिक स्तरही उंचावला पाहिजे, हेच आपले ध्येय आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. रविवारी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षणाची मूळ प्रत मुख्यमंत्र्यांजवळ आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे. या आरोपावर उत्तर देताना अशोक कधी तरी खरे बोलले आहेत का? ते नेहमीच खोटे बोलतात. ते खोटारडे आहेत. जनगणनेची मूळ प्रत आपल्याकडे असणे कसे शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित करतानाच यासंबंधी राहुल गांधी यांना आम्ही पत्र पाठवले नाही. त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल मांडण्यात आला आहे.
जातनिहाय जनगणती अहवालाला काँग्रेसचे आमदारच विरोध करीत आहेत, याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता मंत्रिमंडळ बैठकीत त्याला कोणीच विरोध केला नाही. किंवा कोणी चढ्या आवाजातही बोलले नाहीत. शिफारशी पूर्णपणे वाचल्यानंतर तुमचा अभिप्राय कळवा, अशी सूचना देण्यात आली आहे. मंत्र्यांच्या अभिप्रायानंतर पुन्हा मंत्रिमंडळात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोणत्याही जातींवर अन्याय होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे. हे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षण आहे. संविधान स्वीकारून 75 वर्षे झाली तरी गरीब गरीबच रहावेत का? समानता नको का? एखाद्या जातीलाच चिकटून रहावे का? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे आदीसह काँग्रेसचे अनेक नेते-कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते.









