खेळण्याचे साहित्य मोडकळीस : महापालिकेने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : शहापूर येथील महात्मा गांधी उद्यानातील मुलांचे खेळण्याचे साहित्य, कलाकृतीची नासधूस झाली असून देखभालीअभावी उद्यान भकास बनले आहे. कपिलेश्वर रोडवरील महात्मा गांधी उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वायूविहारासाठी हे उद्यान उपयोगी आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी, व्यायामासाठी तर ज्येष्ठ नागरिक विश्रांतीसाठी येथे दाखल होत असतात. मात्र देखभालीअभावी उद्यानाचा फारसा लाभ होताना दिसत नाही.
महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या या उद्यानाच्या मध्यभागी महात्मा गांधी स्मारक आहे. स्मारकाच्या भोवती विविध झाडे वाढविण्यात आली आहेत. 1999 मध्ये उभारलेले हे उद्यान 2011 मध्ये उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी स्मारकाला रंगरंगोटी, उद्यानामध्ये मोर, हरीण यासारख्या प्राणी, पक्ष्यांच्या कलाकृती येथे उभारण्यात आल्या. त्या काळात पदपथही तयार करण्यात आला. त्यानंतरच्या काळात या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. कोणतीही विकासकामे झाली नसल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.
उद्यानाभोवती तारेचे ग्रील बसविले असून ते गंजून गेले आहे. दोन प्रवेशद्वार असून त्यापैकी एक बंद ठेवण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या प्रवेशद्वाराचा रंग नाहीसा झाला आहे. उद्यानातील मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडकळीस आल्याने निरुपयोगी ठरले आहे. काही झाडांची पडझड झाली आहे. साचलेल्या कचऱ्याची उचल झालेली नसल्याने उद्यानात कचऱ्याचा ढीग झाला आहे. संरक्षण भिंतीजवळ काहीजण कचरा टाकत असल्याने उद्यानाच्या अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे.
महापालिकेने देखभालीकडे त्वरित लक्ष द्यावे
महात्मा गांधी उद्यान सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 4. ते 8 पर्यंत सुरू असते. उद्यानामध्ये विजेचे दिवे असले तरी त्यापैकी काही नादुरुस्त आहेत. महापालिकेचे सफाई कर्मचारी केवळ पदपथावर स्वच्छता करतात. कचऱ्याची उचल व्यवस्थित करत नाहीत. उद्यानातील बेंच मोडून पडले आहेत. महापालिकेने देखभालीकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.









