मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या नावे म्हैसूरमधील मुडात 14 भूखंड गैरव्यवहारावर ईडीने नव्याने प्रकाश टाकला असून या प्रकरणाचे पडसाद कितपत पडतात, हे पाहावे लागणार आहे. 9 डिसेंबरपासून बेळगावात अधिवेशन भरत असून यादरम्यान काँग्रेसमध्ये आता मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी चालली असल्याचे समजते. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र व बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यातील वाद सुरुच आहे. पाटील-यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. हा वाद कधी शमतो, ते पाहावे लागेल. एकंदर या सर्व बाबतीत कुरघोडी राजकारणाला वाव मिळताना दिसतो आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांच्या नावे म्हैसूर येथील मुडामध्ये 14 भूखंड मिळवल्याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. ईडीच्या चौकशीत गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. तर कर्नाटकातील तपास यंत्रणांची अद्याप चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे तयार करून 14 भूखंड लाटल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर भूखंड घोटाळ्यात आपला काहीही संबंध नाही, जो काही व्यवहार झाला आहे, तो नियम व कायद्याला अनुसरूनच झाला आहे, अशी भूमिका घेतली आहे. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात सिद्धरामय्या यांच्यावर यापूर्वी कधीच असे गंभीर स्वरुपाचे आरोप झाले नव्हते. राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या आरोपामुळे गेल्या चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा अहिंदचा जप सुरू केला आहे. राज्यभरात अहिंद मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी याला विरोध केला आहे. काँग्रेस हायकमांडने मात्र या मेळाव्याला परवानगी दिली आहे.
भाजपप्रमाणेच काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष सुरू असला तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्यातील संघर्ष जाणवू नये, याची काळजी घेतली आहे. सार्वजनिकरीत्या हे दोन्ही नेते एकीचे दर्शन घडवू लागले आहेत. या नेत्यांच्या समर्थकात मात्र संघर्ष सुरूच आहे. आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार केलेल्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेसमधील जुन्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. सध्या कर्नाटकात मुख्यमंत्रीपद रिकामे नाही. मात्र, आपल्यात काही सत्ता सूत्रे ठरली होती. ती आपण आता जाहीर करणार नाही. वेळ आल्यानंतर सत्तावाटपासंबंधी काय ठरले होते, हे जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. सिद्धरामय्या यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर अडीच वर्षांनी कर्नाटकात खांदेपालट होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बाजूला काढून निर्धारित सत्ता सूत्रांन्वये डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यासंबंधीची ही चर्चा होती. या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर सिद्धरामय्या समर्थकांनी असे काही ठरलेच नाही, पुढील पाच वर्षे सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले होते.
दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये या मुद्द्यावर कलगीतुरा सुरू होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी तोंड उघडले नाही. आता एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करताना सत्ता सूत्र ठरले आहे. मात्र, ते काय ठरले आहे? ते आपण आता सांगणार नाही, असे सांगत साऱ्याच नेत्यांना धक्का दिला आहे. 9 डिसेंबरपासून बेळगाव येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात बदल होण्याची लक्षणे दिसून येत आहेत. बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही अधिवेशनानंतर काय होणार ते पाहू, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळात बदलाची तयारी सुरू झाली आहे. या चर्चेनंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याभोवती ईडीचे फास आवळत चालले आहे. ईडी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच सत्ताबदल करायचा की ईडीचा निर्णय बघून निर्णय घ्यायचा, या विचारात काँग्रेस नेते असले तरी बदलासाठी तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळातील काही निष्क्रिय मंत्र्यांना वगळून इतरांना संधी देण्यासंबंधीही हालचाली सुरू झाल्या आहेत.
आता भाजपमधील संघर्ष वाढतोच आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरुद्ध उघडपणे आरोप करणारे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दहा दिवसात उत्तर दिले नाही तर तुमच्यावर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी व त्यांचे सहकारी सध्या दिल्लीत आहेत. बसनगौडा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या खासदारांच्या बैठकीत कर्नाटकातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. काही खासदारांनी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना आपला पाठिंबा दिला आहे. तर 32 जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाईसाठी हायकमांडवर दबाव आणला आहे. तर दुसरीकडे बसनगौडा व रमेश जारकीहोळी गटाकडून प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी देशाच्या राजधानीत धडपडत आहेत. या समस्येला सुरुवात झाली, त्यावेळी भाजपच्या हायकमांडने याकडे दुर्लक्ष केले होते. आता ही समस्या मोठी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना बाजूला काढण्यासाठी प्रत्येक नेत्याने आपली शक्ती पणाला लावली आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावर कारवाई करणे पक्षाला परवडणार नाही, असे दिल्लीतील बैठकीत काही खासदारांनी पक्षाला सांगितले आहे.
सध्या कर्नाटक भाजपमधील संघर्ष दिल्लीला शिफ्ट झाला आहे. आजवर गप्प राहिलेले पक्षाध्यक्ष विजयेंद्र हेही आपल्या विरोधकांविरुद्ध सक्रिय झाले आहेत. दोघांपैकी कोणावर कारवाई केली तरी पक्षाचे नुकसान होणार आहे. त्यामुळेच भाजप नेतृत्वाने ‘ठंडा करके खाओ’ धोरण अनुसरले आहे. बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाच्या आत या वादावर पांघरुण घातले नाही तर बेळगाव अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरण्याऐवजी स्वत:च तयार केलेल्या चिखलात भाजप नेत्यांचे पाय रुतणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे त्रास कमी होणार आहेत. त्यामुळेच हा संघर्ष चालतोय तितके दिवस चालू द्या या थाटात काँग्रेस नेते या संघर्षाकडे पाहात आहेत. भाजप नेतृत्वामधील या संघर्षामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी हायकमांडला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण हायकमांडने नोटीस दिल्यानंतरही बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचा जोर कमी झाला नाही. आपला लढा भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध आहे. शेतकऱ्यांना दिशाहीन बनविणाऱ्या वक्फ मंडळाविरुद्ध आहे. तो आपण कधीच थांबवणार नाही, असे बसनगौडा यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केले आहे. त्यांच्या बाजूने कर्नाटकातील काही खासदारांनी आपली शक्ती लावली आहे. हायकमांडला देण्यासाठी त्यांनी उत्तरही तयार केले आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध राग काही कमी होईना. आता येडियुराप्पाही मैदानात उतरले आहेत. या संघर्षामुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर सत्ताधारी काँग्रेस जे काही चालले आहे, ते चालू द्या या भूमिकेत आहेत. बेळगाव अधिवेशनाच्या आधी हा संघर्ष संपला नाही तर अधिवेशनात विरोधी पक्षाचेच हसे होण्याची लक्षणे आहेत.








