राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादादा पवार यांच्यातील कौटुंबिक भेट चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच शरद पवार गटाचे बडे नेते व भाजपाच्या केंद्रीय नेत्यांमध्ये दिल्लीत खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यायाने देशाच्या राजकारणात पुन्हा नवे समीकरण जन्माला येण्याची चिन्हे दिसून येतात. मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढउतार पहायला मिळाले. राजकीय धक्कातंत्र, कुरघोड्या, शह काटशह, करेक्ट कार्यक्रम, कमबॅक यांसारख्या शब्दांनी येथील राजकीय अवकाश व्यापल्याचे पहायला मिळाले. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना, शिवसेनेतील अभूतपूर्व फूट, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार, राष्ट्रवादी फोडून अजितदादांनी युतीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय, अशा एकाहून अधिक घटनांच्या जंत्रीने महाराष्ट्र ढवळून निघाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही चांगल्याच गाजल्या. लोकसभा निवडणुकीत भरवशाच्या महाराष्ट्रातच मोदी सरकारची मोठी पीछेहाट झाली. 48 पैकी केवळ 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीने 30 जागा पटकावल्या. या सगळ्यात उठून दिसले, ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे यश. पवारांची तुतारी चांगलीच वाजली. केवळ दहा जागा लढवून पवारांनी 8 जागा जिंकल्या. तथापि, हा ट्रेंड विधानसभेत बदलला. तरीही शरद पवार आता संपले, असे म्हणण्याचे धाडस कुणी केले नाही. मारकडवाडीत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आदी मंडळींनी पवारांवर जरूर टीकेचे प्रहार केले. मात्र, त्यांच्या या टीकेबद्दल राष्ट्रवादी अजितदादा गटाबरोबरच अगदी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही नापसंती व्यक्त केली गेली. यातच सारे आले. अजितदादा गटाच्या नेत्यांनी तर भाजपच्या या बोलंदाज नेत्यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला असून, त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे. 12 डिसेंबर हा शरद पवार यांचा जन्मदिवस. या दिवशी पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होणे, हा दरवर्षीचा नित्यनेम. हेच औचित्य साधून अजितदादा पवार, त्यांचे कुटुंबीय आणि दादा गटाच्या इतर नेत्यांनी त्यांची भेट घेणेही स्वाभाविकच. परंतु, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आल्याचे दिसते. खरंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आता बराच काळ लोटला आहे. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या दोन महत्त्वाच्या निवडणुकाही पार पडल्या. परंतु, अजूनही राष्ट्रवादीत खरोखरच फूट पडली की ही पवारांची खेळी आहे, याबाबत लोकमनात सांशकता दिसते. त्यामुळे काका आणि पुतण्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या एकीकरणाची शक्यता व्यक्त होत असेल, तर ती अविश्वसनीय ठरू नये. मागच्या काही दिवसांतील राजकीय परिस्थिती पाहिली, तर दादा गटाचे नेते साहेबांविरोधात आणि शरद पवार गटाचे नेते अजितदादांविरोधात फारसे बोलताना दिसत नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला संवाद वाढत चालल्याचे दिसते. हे बघता साहेब आणि दादा पुढच्या टप्प्यात एकत्र येऊ शकतात, असे म्हणायला जागा आहे. लोकसभेत दादा गटाची केवळ एकच जागा आहे. शरद पवार गटाच्या आठ जागांचा यात समावेश झाला, तर या जागांची बेरीज नऊवर जाईल. तर विधानसभेतील एकत्रित सदस्यसंख्या 51 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे दोन्ही पवार गट एकत्र येऊन राज्यात आणि केंद्रात आपली ताकद वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत. शरद पवारांचे बोट धरूनच आपण राजकारणात आल्याचे सांगणे ते केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करणे, यामध्ये मोदी यांनी कधीही आडपडदा ठेवलेला नाही. पवारांचेही तेच. 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. ती पवारांमुळे. सहा महिन्यांपूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार सत्तेवर आले. मात्र, पूर्वीसारखे निर्विवाद बहुमत भाजपाकडे दिसत नाही. उलट चंद्राबाबू, नितीशकुमार यांच्या पक्षांच्या कुबड्यांवर या सरकारला अवलंबून राहावे लागत आहे. अशातच उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार गटाचा बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याचे समोर आल्याने भुवया उंचावणे स्वाभाविकच. तसे अदानींशी शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. त्यामुळे अदानी हा पवार आणि भाजपाला जोडणारा प्रमुख धागा मानला जातो. या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपासोबत जाण्याच्या शक्यता व्यक्त होत असतील, तर त्या कल्पनारम्य मानता येणार नाहीत. याकामी अजितदादांचीही मदत घेण्याचा प्रयत्न असू शकतो. मुळात दोन राष्ट्रवादींचे एकीकरण आणि भाजपाशी समझोता, अशा गोष्टी जुळून आल्या तर महाशक्तीची ताकद आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. तसे पाहिल्यास मागच्या काही दिवसांपासून भाजपाविरोधात दबावाचे राजकारण करणाऱ्या शिंदे गटालाही शह देता येऊ शकतो. लोकसभेत शिंदे गटाने सात जागा मिळवल्या आहेत. या 7 खासदारांच्या माध्यमातून केंद्रात भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे करत असतात. त्यामुळे खातेवाटपही होऊ शकलेले नाही. मात्र, पवार काका पुतण्यांना सोबत घेतले, तर शिंदेंचे महत्त्व आपोआपच कमी करता येईल, अशी भाजपाची रणनीती दिसते. भाजपच्या राजकारणाचा विचार केला, तर त्यांचा क्रमांक एकचा शत्रू हा काँग्रेसच आहे. तर पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्येही सहभागी जनसंघ होताच. हे पाहता काँग्रेसला दाबण्यासाठी नवे समीकरण जुळले, तरी आश्चर्याचे कारण नसेल.
Previous Articleसर्वात अजब मृग
Next Article ईव्हीएम प्रकरण ‘त्याच’ खंडपीठाकडे न्या
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








