रॉबरी केस उघडण्याचे धमकावून केली होती पैशांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
पैशासाठी पोलीस कधी,कोणाला गुन्हेगार ठरवतील याचा नेम नाही. खिसा गरम केला की खरा गुन्हेगारही सन्मानाने सुटतो. नाही तर सर्वसामान्य माणसालाही गुन्हेगार बनविले जाते. बेळगाव परिसरात असे अनेक प्रकार घडले आहेत. शनिवारी रात्री असाच एक प्रकार घडला असून तरुणाने आत्महत्येची धमकी देताच पोलिसांनी पळ काढल्याची घटना घडली आहे.
फसवणूक प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एक तरुण शनिवारी सायंकाळी पोलीस स्थानकात पोहोचला. पोलिसांनी त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले. जामीन मिळाला आहे ठीक आहे. आता आमचे काय? असा प्रश्न विचारीत 1 लाख रुपये दे नाही तर रॉबरी केस उघडतो, असे त्याला धमकावण्यात आले.
पोलिसांकडून अचानक झालेल्या मागणीमुळे त्या तरुणाला धक्का बसला. साहेब माझ्याजवळ पैसे नाहीत. तुम्ही पैशासाठी फारच आग्रह धरला तर तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या करतो, असे त्या तरुणाने ठणकावून सांगितले. त्यानंतर 1 लाख रुपये मागणाऱ्या पोलिसांना धक्का बसला.
आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही काही तरी मिळेल का, यासाठी चाचपणी सुरू झाली. शेवटी त्या तरुणाने आता लगेच जीवन संपवितोच, असे ठणकावून सांगताच लाखाची मागणी करणारे पोलीस पोलीस स्थानकातून गायब झाले. शनिवारी रात्री उशीरापर्यंत संबंधित पोलीस स्थानकात या घटनेची चर्चा सुरू होती.









