शरीरावर धारण करणार एआय कॅमेरा : निरीक्षक, उपनिरीक्षकच देणार तालांव
पणजी : भ्रष्टाचाराने बरबटलेले खाते, पर्यटक तथा वाहनचालकांची लूटमार करणारे खाते, अशी पोलिस खात्याची बनू लागलेली प्रतिमा उजाळणे आणि त्यातून देशभरात चाललेली बदनामी रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून यापुढे केवळ ठराविक हुद्यावरील अधिकाऱ्यांनाच चलन (तालांव) देण्याचे विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार सदर जबाबदारी आता पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच प्रत्येक तालुक्याचा वाहतूक निरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संबंधित अधिकारी कॅमेराधारी असतील. यामुळे चलन देण्याची पारंपरिक पद्धती इतिहासजमा होणार असून यापुढे एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेऱ्याच्या माध्यमातून चलन थेट वाहनमालकाच्या घरी पोहोचणार आहे. शुक्रवारी सचिवालयात आयोजित भारतीय न्याय दंड संहितेच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग, मुख्य सचिव कंदवेलू, वाहतूक पोलिस अधीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांची उपस्थिती होती.
रेन्ट अ कार, बाईक मध्ये येणार शिस्त
याचा सर्वाधिक फटका कायदेशीर वा बेकायदेशीर मार्गाने वाहने पर्यटकांना भाड्याने देणाऱ्यांना (रेन्ट अ कार, बाईक) बसणार आहे. परिणामी चूक कुणीही केलेली असली तरी शेवटी भूर्दंड मालकालाच बसणार आहे. त्यामुळे यापुढे हा धंदा मोठ्या जोखीमीचा बनणार असून वाहन भाड्याने देताना त्यांना ‘ताकही फुंकून प्यावे’ लागणार आहे. असे असले तरी यातून एक चांगली गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे प्रत्येक वाहनमालकाला ग्राहकास सावधतेने वाहन चालविण्याची समज, शिकवणी, सक्ती करावी लागणार आहे. त्यातून अशा वाहनांच्या वाहतुकीत शिस्त येण्यात मदत होणार आहे.
हाच प्रकार पोलिसांच्या बाबतीतही घडणार आहे. आतार्यंत शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत उठसूट कुणीही तालांव देत होते. ते प्रकार यापुढे बंद होणार आहेत. ते अधिकार दोनच अधिकाऱ्यांना देण्यात आले असून दिवसा निरीक्षक आणि रात्रपाळीत उपनिरीक्षक तालांव देऊ शकणार आहेत. महत्वाचे म्हणजे वाहतुकीतील ही बेशिस्ती ते स्वत:च्या दोळ्यांनी नव्हे तर शरीरावर धारण केलेल्या ‘एआय कॅमेऱ्याच्या’ माध्यमातून टीपणार आहेत. त्यामुळे पोलीस आता त्रिनेत्रधारी बनणार आहेत.
लाचखोरीला बसणार चाप
या पद्धतीमुळे लाचखोरी, लूट, हात ओले करणे, यासारखे भ्रष्टाचाराचे सर्व प्रकार कायमस्वऊपी बंद पडणार आहेत. त्यातून, ‘पोलिसाला चिरीमिरी दिली की तालांव टाळता येतो व कोणत्याही गुह्यातून सुटता येते’, अशी वाहनचालकांच्या मनात निर्माण झालेली मानसिकताही पुसली जाणार आहे. सदर दोन्ही अधिकारी आपल्या ड्युटीकाळात नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनाला अडवतील व अपराध दंडनीय असल्यास कॅमेऱ्यातून त्याचे छायाचित्र टीपतील. नंतरची पुढील प्रक्रिया अर्थातच एआय करेल व चलन आपोआप त्याच्या पत्यावर पोहोचते होईल.
अन्य कुणी तालांव दिल्यास थेट निलंबन
सदर दोन्ही अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणी पोलिस चलन देत असल्यास किंवा पैसे मागत असल्यास त्याचा फोटो संबंधित पोलिस स्थानकाला पाठवावा. त्याला निलंबित करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









