उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन
बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल अधिकाधिक जनस्नेही बनावे, असे आवाहन करतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्हेगारी थोपविण्यात बेळगाव जिल्हा पोलिसांनी चांगल्या पद्धतीने सेवा बजावल्याचे बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी सांगितले. पोलीस महानिरीक्षकांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयाला भेट दिली. त्यांना मानवंदना देण्यासाठी आकर्षक परेडचे आयोजन करण्यात आले होते. परेडनंतर बोलताना त्यांनी जिल्हा पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांनी प्रामाणिकपणे सेवा बजावल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामगोंडा बसरगी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी अधिकाधिक जनस्नेही पद्धतीने सर्वसामान्यांची सेवा करावी, असे सांगतानाच गोकाक येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाचा बंदोबस्त उत्तमपणे पार पाडला आहात, आता गणेशोत्सवाची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.









