कोल्हापुरकरांच्या साथीने आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचाच गजर
बाराला वाजाप बंदच
आता विसर्जन मिरवणुकीत परिक्षा
संतोष पाटील/कोल्हापूर
श्रींच्या आगमन मिरवणुकीत बहुसंख्य मंडळांनी डीजेला फाटा दिला. 2013, 2017 व यंदाच्या उत्सवात किमान मर्यादीत आवाजात मिरवणूक निघत असल्याचे समाधान आहे. मर्यादा भंग करणाऱ्यांवर नंतर कायदेशीर होणारच आहे.त्यामुळेच प्रसंगी डीजेचा आवाज चढला तरी पोलीस आणि मंडळात वादाचे प्रसंग घडत नाहीत. नियोजन, समन्वय आणि संपर्काच्या जोरावर नियमात परंतू जल्लोषात उत्सव होईल,हे आगमन मिवणुकीतून पोलिसांनी दाखवले.आता उत्सव कालावधी आणि विसर्जन मिरवणूक कोल्हापूरकरांसह पोलीस प्रशासनाची परीक्षा घेणारी ठरेल. राजकारण्यांनी साथ दिली तर उत्सवातील धिंगाण्याला नक्कीच चाप बसेल.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व त्यांच्या टिमने केलेल्या प्रयत्नांना उत्सवाच्या पहिल्याच दिवशी यश आले. यंदा डीजेचा धिंगाणा होणार, मंडळांना आवर कोण आणि कशी घालणार? असा सवाल सातत्याने विचारला जात होता. जिल्हाभरातील आठ हजार मंडळांशी सतत संपर्क ठेवत, प्रसंगी समजूत काढून तर कायद्याच्या धाक दाखवत पोलीस प्रशासनाने आगमन मिरवणूकीवर बऱ्याच अंशी अंकुश ठेवला. बारानंतर दणदणाट होणार नाही, याची काळजी घेतली.
राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत पोलीस प्रशासन घेत असलेली भूमीका विर्सजन मिरवणुक कशी होणार याचे संकेत देणारी असते. पोलीस प्रशासनाने कणखर भूमिका घेतल्याने कर्णकर्कश धिंगाणा घालणाऱ्या मोजक्या मंडळांना अगोदरच माघार घ्यावी लागली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दोन महिने पध्दतशीरपणे डीजे सिस्टीमला फाटा देण्याची रणनिती आखली. पोलीस ठाण्याअंतर्गत मंडळांच्या बैठका घेतल्या. डीजेमुक्त पोलीस ठाण्यासाठी प्रोत्साहित केले. मंडळांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तरुणाईला डीजे लावल्यानंतर होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती पटविण्यात यश येत आहे.
पोलिसांनी विशेष मंडळावर लक्ष केंद्रीत केले आहे. मंडळांनी काही प्रमाणात आवाज वाढवला तरी पोलीस काहीअंशी कानाडोळा करत आहे. मिरवणुकीचे संपूर्ण व्हिडीओ शुटींग तसेच शहरभर असलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नजर ठेवली आहे. नियमभंग करणाऱ्यावर कारवाई होणार नाही याची हमी कोणीही देवू शकत नाही. अजूनही आठवडाभर पोलिसांचा समन्वयावर भर राहणार आहे. मंडळांनी डीजेला टोला देत, प्रशासनाच्या आवाहनाला साद द्यावी, नेत्रदीपक रोषणाईबरोबर पारंपरिक वादय़े ही यंदाच्या मिरवणुकीची ठळक वैशिष्टे ठरतील अशी आशा सर्वसामान्यांनी करावी, हे राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीतील शिस्तीने दाखवून दिले आहे.
मनोबल वाढविणारा उत्सव
पोलीस अधीक्षकांनी मंडळांप्रमाणेच पोलिसांनाही नियमांचे बंधन घातले आहे. विनाकारण वाद होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मिरवणुकीत कार्यकर्त्यांना खांद्यावर हात ठेवूनच पुढे चला असे सांगावे, काठीचा वापर करु नये असा दंडक घातला आहे. साउंड सिस्टीम नियमापेक्षा आवाज वाढल्यास समजावून सांगावे, सिस्टीमच्या वायरर्स काढू नयेत. मंडळ आणि पोलिसांत वाद होवून तणावाचे वातावरण होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. यातूनही जे मंडळ नियम मोडेल त्यावर उत्सवानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
जगात कोल्हापूरची वेगळी ओळख आहे. साउंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजात निघणारी मिरवणूक ही खचितच कोल्हापूरची ओळख नाही. संपूर्ण गणेश उत्सवासह मिरवणुकीचा सर्व कुटुंबियांसह आनंद घेता आला पाहिजे. यासाठीची नियमावली सर्वांनी पाळण्याची सामाजिक जबाबदारी सर्वांची आहे. विसर्जन मिरवणुकीची आचारसंहिता सहभागी होणारी सुमारे साडेतिनशे मंडळे पाळतील, अशी आशा आहे.
– शैलेश बलकवडे (पोलीस अधीक्षक)
आचारसंहिता ठरणार
विसर्जन मिरवणुकीची आचारसंहिता पोलीस मंडळांना सोबत घेवून ठरवणार आहेत. बिनखांबी गणेश मंडळ ते पापाची तिकटी या दरम्यान कोणत्याही मंडळाची मिरवणूक रेंगाळणार नाही. लहान मोठय़ा सर्व मंडळांना मिरवणूक मार्गावर समान संधी मिळावी, ठरवून दिलेल्या वेळेतच मंडळ पुढे सरकत राहिल. राजारामपूरी प्रमाणेच विसर्जन मिरवणुकीतही ड्रॉ पध्दतीने मंडळांना प्रवेश देण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.









