बांगला देशचा पुढाकार, ‘नकाशा’आगळीकीचा मार्ग
वृत्तसंस्था / अंकारा, ढाका
बांगला देशने पुन्हा एकदा भारताच्या नकाशाशी छेडछाड केली आहे. संपूर्ण ईशान्य भारत बांगला देशच्या नकाशात दाखवून हा नकाशा या देशाने तुर्कीये या देशाला सादर केला आहे. असाच नकाशा काही दिवसांपूर्वी बांगला देशने पाकिस्तनाला सादर केला होता. तुर्कीये देशाचे एक शिष्टमंडळ बांगला देशच्या भेटीवर आले आहे. त्या शिष्टमंडळाला हा नकाशा सादर करण्यात आला आहे.
भारताने बांगला देशच्या या हालचालींवर सूक्ष्म लक्ष ठेवले आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार बांगला देशची ही आगळीक केवळ देखाव्यासाठी नसून ती त्या देशाची भावी योजना आहे. या नकाशासह बांगला देशने एक कागदपत्र संचही तुर्कीयेला सादर केला असून त्यात ‘युद्ध योजना’ नामक एक नोंदही आहे. तसेच या ‘युद्धा’त विजय मिळाल्यानंतर ईशान्य भारताचे काय करायचे याची योजनाही या कागदपत्रसंचात देण्यात आली आहे. आसाम भागाला एक उत्पादक आणि लाभदायक विभाग म्हणून ‘ढाका’ राजवटीत विकसीत केले जाईल असेही उल्लेख या संचात आहे. हा विकृत नकाशा केवळ भारताला प्रक्षुब्ध करण्यासाठी नसून हा हेतुपुरस्सर केलेला एक वैचारिक प्रयत्न आहे. ईशान्य भारताचे इस्लामीकरण करण्याची ही योजना आहे. हा भाग स्वत:च्या देशाला जोडून त्याचे इस्लामीकरण करुन एक व्यापक इस्लामी राज्य या भागात स्थापन करण्याची बांगला देशची महत्वाकांक्षा या संचातून स्पष्ट करण्यात आलेली आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर संस्थाना मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तुर्कीयेचीही योजना
दक्षिण आशिया आणि अग्नेय अशियात तुर्कीये या देशाला आपला इस्लामिक प्रभाव निर्माण करायचा आहे. या भागातील इस्लामी देशांशी सामरिक सहकार्य, ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरण आणि इस्लामी विचारसरणी यांच्या साहाय्याने तुर्कीये आपल्या इस्लामी विचारसरणीचा विस्तार करु पहात आहे. याचा प्रारंभ म्हणून तुर्कीये हा देश बांगला देशशी हेतूपूर्वक लष्करी प्रशिक्षण, संरक्षण उद्योग भागीदारी आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्य यांच्या माध्यमातून जवळीक साधू पहात आहे. तुर्कीये या देशासाठी बांगला देश हा एक सहकारी देश असून त्याच्या साहाय्याने दक्षिण आणि अग्नेय आशिया भागात इस्लामी विचारसरणीचे वर्चस्व निर्माण करता येईल, अशी तुर्कीयेची योजना आहे, असाही इशारा गुप्तचर संस्थानी दिला आहे.
बांगला देशची महत्वाकांक्षा
बांगला देशला आपल्या भूमीचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा आहे. त्याची ईशान्य भारतावर वक्रदृष्टी आहे. ईशान्य भारताचा भाग भारतापासून तोडून बांगला देशला जोडून घेणे आणि नंतर त्याचे इस्लामीकरण करुन एक ‘बृहत् बांगलादेश’ हे इस्लामी राष्ट्र निर्माण करणे, ही बांगला देशची महत्वाकांक्षा आहे. या महत्वाकांक्षेला इतर इस्लामी देश कशा प्रकारे प्रतिसाद देतात याची चाचपणी, विकृत नकाशा सादर करुन बांगला देश करीत आहे. तसेच बांगला देशातील धर्मांध इस्लामी गटांना खूष करण्याचेही हे धोरण आहे, असे गुप्तचरांचे म्हणणे आहे. या घडामोडी वरवरच्या आणि साध्या नाहीत. भारताने वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
अस्थिरतेचा लाभ उठविण्याचा प्रयत्न
सध्या जगात आर्थिक आणि सामरिक अस्थिरतेचे वातावरण आहे. याचाच लाभ उठविण्याचा प्रयत्न बांगला देश करीत आहे. भारताच्या अवती-भोवतीच्या देशांचे समर्थन मिळवून भारत तोडण्याचा डाव कसा साधता येईल, याची पडताळणी बांगला देश करीत आहे. बांगला देशात इस्लामी कट्टरतावाद उफाळून आला असून तेथे होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही कट्टर धर्मवादी लोकांचा विजय होणे शक्य आहे. भारताने ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी, असे तज्ञांचे मत आहे.









