मंत्री ढवळीकर यांचे कागदपत्रांसह विधानसभेत स्पष्टीकरण
पणजी : गृहनिर्माण वसाहतीने जो भूखंड विकसित करण्याचे ठरविले होते, त्यातील जमीन आपल्या पुत्राने खरेदी केलेली नाही. मात्र त्याच्याजवळ आकार रिएलेटर्स कंपनीने विकसित केलेल्या जमिनीतच छोटासा भूखंड खरेदी केलेला आहे. त्यामुळे आपल्यावर अकारण आरोप करणे टाळावे, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विजय सरदेसाई यांना केले. सरदेसाई यांनीही मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरावरच आपण बोललो, असे सांगून हा विषय मिटविला. विधानसभेत गुऊवारी आलेक्स सिक्वेरा यांनी गृहनिर्माण मंडळाच्या भूखंडप्रकरणी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये हस्तक्षेप कऊन आमदार विजय सरदेसाई यांनी ही सूचना मागे घेण्याबाबत संशय व्यक्त केला. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या चिरंजीवाने त्यात भूखंड खरेदी केला, असा गौप्यस्फोट केल्यानंतर संतप्त सुदिन ढवळीकर यांनी विजय सरदेसाई यांना आव्हान दिले होते. या प्रकरणी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपण तयार आहे असे सांगितले. तसेच भूखंड प्रकरण हे इ. स. 2005 मधले आहे. अलिकडेच जेव्हा विजय सरदेसाई हे नगरनियोजन खात्याचे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी मान्यता दिली होती, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली. यावऊन दोघांही नेत्यांमध्ये सभागृहात वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी मंत्री ढवळीकर यांनी यासंदर्भातील कागदपत्रे सभागृहात सादर केली व आपल्या मुलाने घेतलेला भूखंड हा गृहनिर्माण मंडळाचा नाही. तो एक नवा उद्योजक आहे, त्याचे पाय ओढू नका, अशी विनंती केली. विजय सरदेसाई यांनी आपल्या मनात कोणतीही अढी नाही व आपला वैयक्तिक रागही त्याच्यावर नाही, असे जाहीर केले व प्रकरण तिथेच मिटविले.









