महाराष्ट्र-कर्नाटकातील प्रवासीवर्गातून संताप : रस्ता डांबरीकरण त्वरित न केल्यास रास्ता रोकोचा इशारा
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातून महाराष्ट्र हद्दीत जाणाऱ्या सीमेवरील कोल्हापूर भागात तर दुसऱ्या वेंगुर्ले भागातील कर्नाटक सरहद्दीवरती रस्त्यांची इतकी दुर्दशा झाली असताना देखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दोन्ही, महाराष्ट्र कर्नाटकातील प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याने सीमाभाग मराठी लोकांचा भाग म्हणून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा सीमाभागातील जनतेतून करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी अवघ्या अर्धा किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ-मोठे ख•s आणि रस्त्यावर विखुरलेली खडी यामुळे यातून लहानांपासून ते मोठ्या वाहनांपर्यंत हा अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता पार करणे अवघड होऊन बसले आहे. अक्षरश: एवढ्या भागाची चाळण झाली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सरहादीवरचा हा रस्ता असून महाराष्ट्र हद्दीमधील रस्ता उत्कृष्ट प्रतीचा आहे. मात्र कर्नाटकातील अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता खड्ड्यांनी विखुरलेला आहे. बेळगाव, उचगाव भागातून निघालेल्या अनेक प्रवासी उचगाव, बेकिनकेरेमार्गे कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरला जाता येते. तर बेळगाव-वेंगुर्ले हा तर अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या मार्गावरून सावंतवाडी, कुडाळ, देवगड, सिंधुदुर्ग ते वेंगुर्ला अशा भागात जाणारी रोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. मात्र अवघ्या कर्नाटकामध्येच या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करते का? असा संतापजनक प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण करावे. अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा असंख्य प्रवासी व वाहनचालकांनी केला आहे.









