मंत्री रवी नाईक यांचा आरोप : प्रकल्पाचे काम सहा वर्षे रेंगाळत
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा शहर व आसपासच्या भागातील खराब रस्त्यांच्या दुर्दशेला सहा वर्षे रेंगाळत पडलेला मलनिस्सारण प्रकल्प कारणीभूत असल्याचा आरोप फेंडय़ाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांनी केला आहे. वरचा बाजार फोंडा येथील विठोबा मंदिर ते तळे दुर्गाभाट पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
कुठलेच योग्य नियोजन व भू सर्वेक्षण न करताच हा प्रकल्प हाती घेतल्याने प्रकल्पाचे काम संपता संपत नाही. त्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात आहेत. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दाग, तिस्क फोंडा तसेच इतर भागातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण रखडले आहे. मलनिस्सारण प्रकल्प महामंडळातर्फे तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी रवी नाईक यांनी केली आहे.
वारखंडे फोंडा येथील हनुमान मंदिर ते वरचा बाजारपर्यंतचा मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडून पडल्याचे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. भगवती कंस्ट्रक्शनचे संकेत मुळे यांना सन् 2019 मध्ये हे काम मिळाले होते व 2020पर्यंत ते पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र या कंत्राटदाराने कुर्टी ते संगम बेकरीपर्यंत अर्धा रस्ताच पूर्ण केला. उर्वरित रस्त्याचे काम चार वर्षे रेंगाळत पडल्याबद्दल या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती साहाय्यक अभियंते अरविंद फडते यांनी दिली. यापूर्वीही सदर कंत्राटदाराला चार वेळा स्मरणपत्रे पाठवूनही त्यांनी रस्त्याचे काम सुरु केलेले नाही. या नोटीसेला त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फोंडय़ातील उर्वरीत रस्ते व अंतर्गत रस्त्यांच्या निविदा झाल्या असून येत्या काही दिवसात टप्याटप्प्याने हॉटमिक्स डांबरीकरण होणार आहे.
विठोबा मंदिर ते दुर्गाभाट तळेपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. साधारण रु. 90 लाख खर्चून हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन ते चार दिवसात ते पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक शांताराम कोलवेकर, आनंद नाईक, माजी नगराध्यक्ष किशोर नाईक, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक व अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.









