सोशल मीडियावर नागरिकांची नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेच्या शववाहिकेची पार दुर्दशा झाली आहे. मृतदेह उचलून नेण्यासाठी असलेले स्ट्रेचरचे कुशन खराब झाले असून याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. नाईलाजास्तव नागरिकांना या वाहनांचा वापर करावा लागतो आहे.
गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी यासंबंधीची काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट केली. त्यानंतर नागरिकांनी शववाहिकेची झालेली दुर्दशा पाहून मनपाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रकार पालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी यांना समजताच त्यांनी त्वरित दुरुस्तीची सूचना केली आहे.
माणसाच्या शेवटच्या प्रवासासाठी या शववाहिकांचा वापर होतो. स्मार्ट सिटी बेळगावमधील शववाहिकेच्या आतील भागात झालेली दुरवस्था लक्षात घेता प्रशासनाचे याकडे किती लक्ष आहे? हे जाणवते. समाजमाध्यमांवर अनेक नागरिकांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली. स्ट्रेचरचे कुशन फाटून गेले आहे. दरवाजाच्या आतील भागाचीही मोडतोड झाली आहे. त्यामुळे मनपा अशा प्रकारांकडे किती गांभीर्याने पाहते? हे दिसून येत आहे.