शहरात प्रवेश करताना खड्ड्यांचा मुकाबला : स्थानिक आमदार, खासदारांसह प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांतून तीव्र संताप
खानापूर : खानापूर शहरात प्रवेश करताना खड्ड्यांचा सामना करत दुचाकी, चारचाकी वाहनांसह चालत येणाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहराच्या सर्वच प्रवेशद्वारांच्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. याच रस्त्यावरून आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकामाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी याच खड्ड्यातून मार्ग काढत शहरात प्रवेश करत आहेत. मात्र कुणालाही खड्डे बुजविण्याबाबत तसदी घ्यावी असे वाटत नाही. याचे आश्चर्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. या खड्ड्यांच्या त्रासामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळोवेळी या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी करूनदेखील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. येत्या आठ दिवसात रस्त्यांची डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बेळगावकडून प्रवेश करताना राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
त्यातल्यात्यात रुमेवाडी नाका ते करंबळ क्रॉसपर्यंतचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याच्या बांधकामाबाबत वेळोवेळी आंदोलने, मोर्चे झाले. लोकप्रतिनिधीनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. एकात्मिक विकास योजनेच्या अंतर्गत या रस्त्याच्या विकासासाठी जवळपास 14 कोटी मंजूर झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याच्या मागील गौडबंगाल काय, हाच सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. रुमेवाडी क्रॉसपासून पारिश्वाड क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची चाळण झालेली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने यातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. तसेच पारिश्वाड क्रॉसकडून खानापुरात प्रवेश करताना नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गाच्या शेजारील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून शंभर मीटर रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.

पावसामुळे रस्त्याची दुर्दशा
जवळपास संपूर्ण रस्त्यावर गुडघाभर चर पडल्यासारखी अवस्था या रस्त्याची झाली आहे. याच रस्त्यावरून आमदारांची रोज ये-जा असते. मात्र सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असतानादेखील या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आमदारांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. याचे आश्चर्य नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी पर्यायी रस्ता वाहनधारक विचार करत आहेत. मात्र सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाल्याने आहे त्याच रस्त्यातून धोका पत्करून प्रवास करत आहेत.
प्रशासनासह लोकप्रतिनिधीबद्दल तीव्र प्रतिक्रिया
शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजा छत्रपती चौकापासून ते नगरपंचायतीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याही रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून अवघ्या आठशे मीटर रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वेस्टेशनकडून होणारा प्रवेश त्रासदायक बनलेला आहे. याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय, पोस्ट कार्यालय, नगरपंचायत, रेल्वेस्टेशन, सर्वोदय विद्यालय, दवाखाना यासह इतर कार्यालये आहेत. मात्र या रस्त्याचा विकास मात्र करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांतून प्रशासनाबद्दल आणि लोकप्रतिनिधीबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









