रस्त्याअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /जांबोटी
चिखले-पारवाड संपर्क रस्त्याची पार दुर्दशा झाली असून हा रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक बनल्यामुळे रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चिखले गावापासून ते पारवाडपर्यंतच्या संपर्क रस्त्याचे अंतर एकूण सहा किलोमीटर आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी या रस्त्याचे केवळ खडीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्याचे एकदा सुद्धा डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्त्यावर नावालाच खडी शिल्लक आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध गटारी सदृश चरी पडल्या असून या रस्त्यावर सर्वत्र ख•dयांचे साम्राज पसरल्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी चालवणे देखील दुरापास्त झाल्याने खराब रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा मुकाबला करावा लागत आहे.
वास्तविक पाहता चिखले या गावचा समावेश पारवाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असल्यामुळे या गावच्या नागरिकांना पंचायत कामकाज तसेच इतर शासकीय कामासाठी नियमित पारवड येथे ये-जा करावी लागते. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. चिखले गावच्या नागरिकांना पारवाड येथे संपर्क साधावयाचा झाल्यास चिखले फाटा ते बेळगाव-चोर्ला महामार्गावरून कणकुंबी गावाला वळसा घालून सुमारे 15 ते 20 किलोमीटर जादा प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिकांचे श्रम व वेळ वाया जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तसेच चिखले गावचा निसर्गरम्य सौतुरा हा धबधबा पाहण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागत असल्यामुळे पर्यटकांना देखील खराब रस्त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागतो. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व खानापूर उपविभागाच्या जिल्हा पंचायतच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून चिखले-पारवाड रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी चिखले-पारवाड या दोन्ही गावच्या नागरिकांमधून होत आहे.









