रस्त्यावर गुडघाभर चिखल : तात्पुरत्या दुरुस्तीची मागणी
उचगाव : उचगावच्या पूर्वभागात हजारो एकर जमिनीतील शेतवडीत ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या सारण रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर गुडघाभर चिखल झाल्याने चालणेदेखील मुश्कील झाले आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने बोर्डर, खडी टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील पश्चिम भाग तसेच उचगाव भागामध्ये शेतकरी वर्गाला शेतवडीत ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते कोणत्याच भागात नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होत असते. उचगावच्या चोहोबाजूने हजारो एकर जमिनीत शेतकऱ्यांची शेतवडीत पिके पिकविण्यासाठी रात्रंदिवस ये-जा असते. मात्र पक्के रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
याची दखल लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेळगाव तालुक्यामध्ये काही क्षेत्रांमध्ये शेतात जाण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, (एपीएमसी), आमदार, खासदार फंडातून सिमेंटचे पक्के रस्ते केलेले दिसून येतात. परंतु या भागात काँक्रिटीकरण केलेले रस्ते कोठेच दिसून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची सातत्याने कुचंबणा होत असते. यासाठी एपीएमसी व लोकप्रतिनिधीनी या शेतवडीत शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी काँक्रिटीकरण रस्ते प्रथमत: केले पाहिजेत. तरी तातडीने याचा विचार लोकप्रतिनिधीनी करून शेतवडीत येजा करण्यासाठी पक्क्या रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.









