बेंगळूरनंतर सर्वाधिक महसूल उत्पन्न देऊनही सुविधांचा अभाव
बेळगाव : बेंगळूरनंतर सर्वाधिक महसूल हा बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रामधून राज्य सरकारला मिळतो. परंतु, त्या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने उद्योजक हैराण आहेत. ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावरच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सामानाची वाहतूक करणारे ट्रक कारखान्यापर्यंत जात नसल्याने उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास झाला. परंतु, अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कणबर्गी रस्त्यावर तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्यावरच खड्डे पडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी
या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी व मालवाहू ट्रक, कंटेनर यांची वाहतूक होत असते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे अवघड झाले आहे. तसेच अपघातही वाढले आहेत. त्यामुळे निदान तात्पुरती डागडुजी तरी करावी, अशी मागणी होत आहे.









