दुरुस्तीकडे उचगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप
वार्ताहर /उचगाव
उचगाव गावातील जवळपास 90 टक्के गल्ल्यांतील रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि डांबरीकरण करून रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र अद्याप काही भागातील रस्ते न झाल्याने सदर रस्त्यांची दुर्दशा झाली असून यामध्ये रवळनाथ गल्ली आणि नागेशनगर या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. इतका चिखल या रस्त्यावरून झाल्याने या गल्लीमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असून तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करून खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. लक्ष्मी गल्लीशी असलेला अॅप्रोच रस्ता रवळनाथ गल्लीतून पुढे शेतवडीत त्याचबरोबर मुरकुट गल्लीमधून जात असल्याने नागरिकांची ये-जा असते. मात्र रवळनाथ गल्लीमध्ये इतका चिखल झाल्याने इथून चालणे मुश्किल झाले आहे. तर दुचाकी वाहनावरून ये-जा करताना ही वाहने घसरून अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत. यासाठी सदर रस्त्याची पावसाळ्यात तात्पुरते का होईना खडीकरण करून दुरुस्ती करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. याचबरोबर नागेशनगर भागामध्ये उचगावमधील बरीचशी कुटुंबे या नवीन वसाहतीत घरे बांधून आहेत. यामुळे नागेशनगरमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी नागेशनगरमध्ये ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग चिखलाने माखल्याने त्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यासाठी याही रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागेशनगर भागातील जनतेने केली आहे.
गल्ली विकणे आहे
उचगावमधील रवळनाथ युवक मंडळाच्या फलकावरती येथील युवकांनी खराब रस्त्याच्या निषेधार्थ त्रस्त झालेल्या नागरिकांनी रवळनाथ गल्लीची विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना कुणाला व्यवहार करायचा असेल त्यांनी कृपया ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे उपरोक्त लिखाण केले आहे.तरी ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घेऊन या गल्ल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









