येळ्ळूरवासियांचा निर्धार : मोर्चा काढण्याचा इशारा
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील गायरान जागेमध्ये क्रीडांगण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला गावातील सर्वांनीच तीव्र विरोध दर्शविला आहे. रविवारी येळ्ळूर चागळेश्वरी मंदिरामध्ये बैठक झाली. बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण कंग्राळकर होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
येळ्ळूरच्या गावठाण जागेमध्ये क्रीडांगण उभे करण्यात येत आहे. त्यामुळे गावाला गावठाण जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्रीडांगण होऊ देणार नाही, असा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचाही विचार मांडला.
ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव करूनदेखील आम्हाला पुन्हा नोटीस दिली आहे. आमचा या क्रीडांगणाला पूर्णविरोध आहे असे असताना जिल्हा प्रशासनाने नोटीस दिली आहे. एक महिना उशिरा नोटीस दिल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीमध्ये ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, दत्ता उघाडे, अशोक कोलकार, दुधाप्पा बागेवाडी, सतीश गणपती पाटील, मनोहर पाटील, नारायण पाटील, रमेश धामणेकर यांनी विचार मांडले. बैठकीला शांताराम कुगजी, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, जोतिबा चौगुले, शिवाजी नांदुरकर, राकेश परीट, तानाजी हलगेकर, शिवाजी पाटील, वामन पाटील, परशराम घाडी, भरत मासेकर यांच्यासह इंदिरानगर येथील महिलादेखील उपस्थित होत्या. बैठकीला मंदिरामध्ये मोठी गर्दी झाली होती.









