प्रतिनिधी /तिसवाडी
कै. अनंत विष्णू शेट यांच्या स्मरणार्थ शनिवार दि. 4 रोजी संध्याकाळी 6.30 वा. रविंद्र भवन साखळी येथे आणि कै. दयानंद मधुकर फडते यांच्या स्मरणार्थ रविवार दि. 5 रोजी संध्या. 6.30 वा. राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे संगीत ययाति आणि देवयानी हा नाटय़प्रयोग मुंबई, पुणे तसेच गोव्यातील कलाकार संयुक्तपणे सादर करण्यात आहेत.
हे नाटक अत्यंत यशस्वी ठरले असून गेल्या 56 वर्षे सातत्याने रंगमंचावर अनेक कलाकार आपापल्यापरीने ते सादर करीत आहे, असे साई पुर्वा आर्टस्चे भालचंद्र उसगांवकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत दिग्दर्शक अविनाश पुर्खे, अभिनेते महेंद्र बांदोडकर, चितानंद मडकईकर, संदिप ग. नाईक, विदेश मडकईकर यांची उपस्थिती होती.
भालचंद्र उसगांवकर पुढे म्हणाले की, या नाटकातुन महाभारतील कथा नावीन्यपूर्णतेने रंगभूमिवर आणण्याची किमया लेखक वि. वा. शिरवाडकरानी केली आहे. कच आणि देवयानीची जगावेगळी मैत्री, तसेच मैत्रीचे अन्य अनेक पैलू अंधोरेखित करणारं अविस्मरणीय नाटक आहे. तसेच अवीट गोडीची गाणी या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट आहे. आजच्या तरूणांना या नाटकातून मैत्रीचे अंतरंग वेगळय़ा रूपात दिसू शकेल.
पं. जितेंद अभिषेकीचं संगीत नाटकाला लाभलेले आहे. या प्रयोगाचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकीचे शिष्य चिन्मय जोगळेकर या नाटकात कच ही भूमिका साकारित आहे. जयमाला शिलेदार यांच्या शिष्या सौ. श्रध्दा सबनीस ही देवयानी भूमिका करणार आहे. नाटय़संगीतातील स्वरसम्राज्ञी समजणारी गौरी पाटिल ही शर्मिष्टेच्या भुमिकेत दिसणार आहे आणि ययातीची भुमिका गोव्यातील नाटय़ कलाकार भालचंद्र उसगांवकर साकारणार आहे.
या नाटकात संगीत साथ गोव्यातील आघाडीचे कलाकार दत्तराज सुर्लकर व तबलावादक शैलेश गांवकर यांची आहे. पार्श्वसंगीत खेमराज पिळगांवकर, नेपथ्य भूषण सावंत यांची आहे. या दोन्ही प्रयोगाचे नाममात्र देणगी प्रवेशिका, कुपन नाटय़गृहावर उपलब्ध आहे.









