बेळगाव तालुक्यात राजरोसपणे प्लास्टिक वापर सुरूच : प्लास्टिक विक्रेत्यांचा परवाना रद्दचा इशारा फोल : कापडी पिशवी वापराकडे नागरिकांचेही दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील प्लास्टिक बंदीचे फर्मान बिनकामाचे ठरले आहे. राजरोसपणे तालुक्यातील अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक विक्री करण्यात येत आहे. केवळ चार दिवस फिरून फोटो काढून वृत्तपत्रातून ते देऊन आपले काम संपले, अशी भूमिका घेतलेल्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आता आपले डोळे बंद केले आहेत. एकीकडे दुकान परवाना रद्द करतो, असे सांगणारे अधिकारी आता गायब झाले असून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही मोहीम कुचकामी झाली असून यापुढे तरी विचार करणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्ह्यासह राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. सध्या काँग्रेसचे सरकार आले आहे. दरम्यान प्लास्टिक बंदीची मोहीम यशस्वीपणे राबविल्यास सोयीचे ठरणार आहे. नाही तर मोठा धोका उद्भवणार यात शंका नाही. बेळगाव तालुक्मयात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. याला कारणीभूत म्हणजे प्लास्टिक. यामागे प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते फोल ठरले. त्यामुळे चार दिवस कारवाई करून अधिकारीवर्ग गप्प बसतात, असे साऱ्यांच्याच मनात झाले आहे. मात्र आपण त्यापैकी नसून तालुका प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे.
सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी म्हण अधिकारीवर्गाच्या कारभारामुळे ऊजत आहे. तालुक्मयातील दुकानदारांनी प्लास्टिक बंदी करावी, अन्यथा त्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधिकारीवर्गाने दिला होता. मात्र अधिकारी बदलले की समीकरणच बदलते. त्यामुळे नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना घरकामातून सवड मिळल्यास ही मोहीम किंवा अशा अनेक सरकारी योजना राबविण्यावर भर देतील का? असा सवालही उपस्थित होत आहे. प्रदूषणमुक्त भारत योजनाही फोल ठरली असून तालुक्यातील प्लास्टिक बंदी कधी होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली होती. प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. याला प्लास्टिकच कारणीभूत असून तालुक्मयातील सर्व दुकानदारांना यासाठीची नोटीस ग्राम पंचायतीच्या माध्यमातून बजावण्यात आली होती. त्यानंतरही प्लास्टिकमधून साहित्य देण्यात येत असल्याचे आढळल्यास कारवाई करून ते प्लास्टिक जप्तही केले होते. तर व्यावसायिक परवानाही रद्द करण्यात येणार, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर राजरोसपणे प्लास्टिक विक्री सुरू आहे. बेळगाव तालुक्मयातील शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा दिसून येत आहे. सध्या काही ग्रामपंचायतींमध्ये घंटागाडीची सोय केली आहे तर प्रत्येक गावात घंटागाडी फिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. घंटागाडीत कचरा दिल्यास ते सोयीचे ठरणार आहे. मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी तालुक्यात प्लास्टिक बंदी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होणार
य् ााआधीही प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे आता तालुक्मयातील व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात येईल व दंडही आकारण्यात येणार आहे. नागरिकांनीही कापडी पिशव्या वापरल्यास प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होणार आहे. यासाठी आता लवकरच पाऊल उचलण्यात येणार आहे.
– ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर
नागरिकांनीही सुज्ञपणा दाखविल्यास प्लास्टिक बंदी शक्य
बेळगाव तालुक्मयातील कोणत्याही व्यवसायाला परवानगी न घेता अनेक दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्यांनी रितसर परवाना ग्राम पंचायतीकडून घेतला नाही. ज्यांच्याकडे वाहन परवाना आहे त्यांनी तो नुकतीकरण करून घेण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर इतर व्यवसायासाठी लागणारे परवाने ग्राम पंचायतीमधून घ्यावेत, असे आवाहन केले होते. मात्र त्याकडेही अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी याचा फटका अनेकांना बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी प्लास्टिकला थारा न देता कापडी पिशवीचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सुज्ञपणा दाखविल्यास प्लास्टिक बंदी होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.








