कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
रेल्वे प्रशासनाने एक नंबरच्या रेल्वे फाटकावर संरक्षक भिंत बांधल्यापासून रेल्वे रुळावरुन होणारी रहदारी पूर्णत: थांबली आहे. यामुळे सद्या नागरिकांनी परीख पुलाखालून रहदारीचा पर्याय स्वीकारला आहे. परीख पूलाखालून नागरिक आणि वाहनधारकांची होणारी रहदारी धोकायदायक आहे. यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाचे नियोजन असून तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले होते. पण या भूमीपूजनाची वर्षपूर्ती होत आली तरी पुलाच्या कामाचा पायाही निघाला नाही. परिणामी परीख पूलाखालून पादचाऱ्यांची धोकादायक रहदारी सुरुच आहे.
काही वर्षापूर्वी सर्वच रेल्वे फाटकावरुन रहदारी होत होती. रेल्वे आली किंवा निघाली की काही वेळेसाठी फाटक बंद केले जात होते. त्या बंद फाटकातूनही काही लोक रुळ ओलांडत होते. अशा प्रकारे रुळ ओलांडण्याने अपघात होऊ लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाने फाटक पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. टेंबलाई रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधल्याने येथील रुळावरुन रहदारी करण्याचा मुद्दा निकालात निघाला आहे. एक नंबर रेल्वे फाटकावर दोन्ही बाजूला भिंत बांधून हा रुळावरुन पादचाऱ्यांचा होणारा प्रवास थांबववण्यात आला. यामुळे रुळावरुन होणारी धोकादायक रहदारी थांबली असली तरी परीख पूलाखालून होणाऱ्या रहदारीचा धोका थांबलेला नाही.
या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजारामपुरीकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे आणि बसस्थानकाकडून राजारामपुरीकडे जाण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून 3 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यांच्याच हस्ते प्रस्तावित उड्डाणपूलाचे भूमीपूजन झाले होते. पण एक वर्षे झाले तरी या उड्डाणपुलाचा पायासुध्दा काढला गेला नाही. यामुळे पादचाऱ्यांची परीख पुलाखालून जीव धोक्यात घालून प्रवास सुरु आहे.
- ओव्हरब्रीजच्या पर्यायात अडथळे
राजारामपुरीकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे किंवा मध्यवर्ती बसस्थानकाकडून राजारामपुरीकडे जाण्यासाठी सद्या परीख पुलाचा वापर केला जात आहे. परीख पूल हे पाणी वाहून जाण्यासाठी आहे. या पुलाखालून वाहतूक आणि रहदारी करणेही धोकादायक आहे. यासाठी दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी जनता बझार चौक अशा ओव्हरब्रीजचा पर्याय पुढे आला होता. त्यासाठी काही वर्षापूर्वी निधीही मंजूर झाला होता. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील विसंवाद यामुळे ओव्हरब्रीज मार्गी लागला नाही.
- नवीन डिझाईन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडे सादर
महापालिकेने उड्डाणपुलाचे डिझाईन तयार केले होते. यानंतर रेल्वेचे निकष बदलले. यामुळे बदलेल्या निकषाप्रमाणे नवीन डिझाईन तयार करुन ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडे पाठवले आहे. याबाबत नुकतीच पुण्यात बैठक झाली आहे. दोन दिवसात नवीन डिझाईनला मंजुरी मिळेल. त्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल.
नेत्रदीप सरनोबत– शहर अभियंता, कोल्हापूर महापनगरपालिका
- भूमिपूजन झालेला नियोजित उड्डाणूपल असा होता
निधी मंजूर 3 कोटी 88 लाख रुपयांचा
पुलाची लांबी – 52 मीटर,रुंदी 3.60 मीटर
तीन पिलरचे बांधकाम
उंची रेल्वे रुळापासून 6.5 मीटर








