अमेरिकेतील दुर्घटनेत 140 प्रवासी बचावले : पायलट जखमी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाची विंडशील्ड हवेतच फुटल्यामुळे विमान 10,000 फूट खाली आल्याचा प्रकार नुकताच घडला. या घटनेत पायलट जखमी झाला असून सुमारे 140 प्रवासी आणि कर्मचारी बचावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वैमानिकासमोरील काचेला तडे गेल्यामुळे डेन्व्हरहून लॉस एंजेलिसला जाणारे विमान आपत्कालीन लँडिंगसाठी सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवावे लागले. यशस्वी लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना बोईंग 737 मॅक्स-9 या दुसऱ्या विमानाने लॉस एंजेलिसला रवाना करण्यात आले. घटनेनंतर ऑनलाइन समोर आलेल्या फोटोंमध्ये तुटलेली काच आणि वैमानिकाच्या हाताला झालेल्या जखमा दिसून येत आहेत.
अमेरिकेतील डेन्व्हरहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाच्या बाबतीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विमान 36,000 फूट उंचीवर उ•ाण करत असताना अचानक समोरील काच तुटली. या घटनेत एक वैमानिक जखमी झाला. विंडशील्ड तुटल्यानंतर विमान 10,000 फूट खाली आले. वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन प्रक्रिया राबवून विमानाला साल्ट लेक सिटी विमानतळावर सुरक्षितपणे उतरवल्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही, परंतु विमान सुमारे सहा तास उशिरा पोहोचले.
विमानाची विंडशील्ड सामान्यत: पक्ष्यांचे आदळणे किंवा उच्च दाब सहन करू शकतात, परंतु अवकाशातील कोणत्याही आघातामुळे किंवा लहान उल्कापिंडाशी टक्कर झाल्यामुळे काचेचे नुकसान होऊ शकते, असे मत वैमानिक तज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, क्रॅकचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. तसेच कंपनीने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. ही घटना विमान उद्योगासाठी गंभीर मानली जाते कारण विंडशील्ड तुटणे अत्यंत दुर्मिळ आहे.









