ही घटना हे कोणत्यातरी स्टंट चित्रपटातील सनसनाटी दृश्य मुळीच नाही. तर ही प्रत्यक्ष घडलेली सत्य घटना आहे. 32 वर्षांपूर्वी म्हणजे 10 जून 1990 या दिवशी ब्रिटीश एअरवेज या नागरी विमानवाहतूक कंपनीचे विमान नेहमीप्रमाणे बर्मिंगहॅम विमानतळाहून स्पेनला जाण्यासाठी उडाले. आकाशात 23 हजार फूट उंची त्याने गाठली. विमानाचा वेग 800 किलोमीटर प्रति तास इतका मोठा होता.
एवढय़ा उंचीवर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, अचानकपणे विमानाची एक खिडकी तुटून खाली पडली. त्या जागेतून प्रचंड वेगाने वारा आत घुसला आणि विमानाचा चालक अक्षरशः भेलकांडला. तो त्याच्या आसनावरुन खेचला जाऊन खिडकीतून चक्क बाहेर लटकू लागला. तो विमानाबाहेर फेकला केला असता. पण विमानातील त्याचा सहचालक असणाऱया नाईलेज ऑग्डेन यांने चपळाईने त्याचे पाय पकडून त्याला आत खेचले. त्यामुळे त्याचा आणि पर्यायाने विमानातील सर्व प्रवाशांचाही जीव वाचला. चालकाच्या कक्षात अद्यापही वारे इतक्या वेगाने घुसत होते की कक्षातील कागदपत्रेही इतस्ततः उडू लागली होती. काय करावे हे कोणालाही सुचत नव्हते. यावेळी कक्षात चालकासह सहचालक आणि आणखी एक कर्मचारी होता. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
तोपर्यंत विमानातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना श्वासोश्वासास त्रास होऊ लागला होता. वेळ अगदी कमी होता. दोन मिनिटांमध्ये काहीतरी करणे आवश्यक होते. चालक एटचिसन याने प्रसंगावधान राखून विमान बरेच खाली आणले. हवेचा दाब वाढून प्रवाशांना कसाबसा श्वास घेता येऊ लागला. नियंत्रण कक्षातून विमानचालकाला आहे त्या परिस्थितीत विमानाचे लँडिंग साऊदप्टन विमानतळावर करण्याचा आदेश देण्यात आला. चालकाने विमान प्रवासाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात धोकादायक लँडिंग यशस्वीरित्या केले आणि साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. विमान वाचले. प्रवासीही वाचले आणि कर्मचारीही वाचले. या घटनेची आज आठवण होण्याचे कारण असे की या घटनेवर आता चित्रपट काढण्याची योजना आकाराला येत आहे.