आमदार दिगंबर कामत यांचे मत
प्रतिनिधी /मडगाव
राज्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत गोव्यातील जनतेला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजना घोषित करण्यात आली. मात्र, अद्याप ही योजना अधिसूचित झालेली नाही. ही योजना अधिसूचित झाल्यानंतरच तिचा लाभ कुणा-कुणाला मिळू शकतो हे स्पष्ट होईल असे मत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.
वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत या योजनेचा लाभ केवळ दारिद्रय़रेषेखालील लोकांनाच मिळणार असल्याचे वृत्त सद्या सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे सद्या गोंधळाची परिस्थिती आहे. मुळात या योजनेची घोषणा करताना ती सर्वांसाठी असेल असा सर्वांचाच समज होता. मात्र, आत्ता केवळ दारिद्रय़रेषेखालील लोकांसाठी असल्याचे वृत्त पुढे येऊ लागल्याने, नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
या संदर्भात काल आमदार दिगंबर कामत यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते म्हणाले की, ही योजना अगोदर अधिसूचित झाली पाहिजे. जो पर्यंत ही योजना अधिसूचित होत नाही, तो पर्यंत या योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो हे स्पष्ट होणे कठीण आहे.
दारिद्रय़रेषेखालील लोकांनाच लाभ होईल असे वृत्त आपण वृत्तपत्रातून वाचले आहे. पण, जो पर्यंत योजनेची अधिसूचना निघत नाही, तो पर्यंत योजना स्पष्ट होणार नाही. मुळात सरकारने योजना घोषित करताना ती ठराविक घटकांसाठी असे नमूद केले नव्हते. आत्ता जर ती केवळ दारिद्रय़रेषेखालील लोकांसाठी असेल तर इतरांना तिचा लाभ का मिळणार नाही हे देखील सरकारने स्पष्ट करावे लागणार असल्याचे श्री. कामत म्हणाले.









