कृषी, पिण्यासाठी पाणी हा केवळ बनाव
प्रतिनिधी/ पणजी
म्हादई नदीच्या पाण्यासंदर्भात कर्नाटक सरकार गोमंतकीयांची भलावण करत असतानाच स्वत:च्या नागरिकांचीही फसवणूक करत आहे. म्हादईचे पाणी आपल्या नागरिकांची तहान शमविण्यासाठी व स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हवे असा आभास ते निर्माण करत असले तरी त्यांना ते पाणी जिंदाल, अदानी, वेदांता यासारख्या बड्या उद्योगपतींच्या स्टील आणि कोळसा आधारित वीज प्रकल्पांच्या गरजा भागविण्यासाठी हवे आहे. कर्नाटकाने चालविलेले हे कटकारस्थान असून हे सरकार उद्योगपतींचे गुलाम बनले आहे, असा दावा पर्यावरणप्रेमी अभिजित प्रभुदेसाई यांनी केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने कर्नाटकातील बेल्लारी, हॉस्पेट, बेळगाव, हुबळी, धारवाड, कुडकी, सोलापूर, बिजापूर, गुलबर्ग, विजयनगर आणि रायचूर या सुमारे 300 किलोमिटरच्या पट्ट्यात ’स्टील कॉरिडॉर’ उभारला आहे. तेथे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सिमेंट, स्टील, तसेच कोळसा आधारित वीज प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी अनेक बड्या उद्योजकांना त्यांनी निमंत्रित केले आहे. हे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पाणी हा अविभाज्य स्रोत म्हणून आवश्यक आहे. त्यामुळेच म्हादईचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळवत असून हा प्रकार म्हणजे मोठे कटकारस्थान आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.









