येळ्ळूरच्या ‘त्या’ आयोजकांना मिळाला मोठा दिलासा : पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी
प्रतिनिधी / बेळगाव
निवडणूक आचारसंहिता भंग केली म्हणून संभाजी भिडे गुरुजींसह येळ्ळूरच्या महाराष्ट्र कुस्ती आखाड्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. निवडणुकीच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र 2018 पासून ते न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने फिर्यादीलाच खटल्यातून वगळले आहे. त्यामुळे मोठा दिलासा भिडे गुरुजींसह कुस्ती आखाड्याच्या आयोजकांना मिळालाआहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून संभाजी भिडे गुरुजी, किरण गावडे, प्रदीप देसाई, विलास नंदी, डी. जी. पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, मधू पाटील, नागेंद्र पाखरे, मारुती कुगजी (मयत), लक्ष्मीकांत मोदगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या सर्वांविरोधात जेएमएफसी द्वितीय न्यायालयात दोषारोप दाखल केले आहेत. त्याठिकाणी नियमित सुनावणी सुरू आहे.
मात्र निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी एस. बी. नाईक न्यायालयात हजर राहिले नाहीत. विधानसभेची निवडणूक 2018 साली झाली. त्यावेळी येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीची यात्रा सुरू होती. या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कुस्ती मैदानामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह वरील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी भिडे गुरुजी यांनी म. ए. समितीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला म्हणून भिडे गुरुजींसह कुस्ती आखाडा आयोजकांवरही गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र त्याठिकाणी फिर्यादीच गैरहजर राहिल्यामुळे त्यांना वगळले आहे. पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.









