वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गब्बा मैदानावर पहिली क्रिकेट कसोटी झाली. केवळ दोन दिवसांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सहा गडय़ांनी पराभव करून मालिकेत आघाडी मिळवली आहे. ही कसोटी केवळ दोन दिवसात संपल्याने खेळपट्टीच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली पण गब्बाची खेळपट्टी साधारण असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.
या पहिल्या कसोटीत दोन्ही संघांचे गोलंदाज गाजले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 152 तर दुसऱया डावात केवळ 99 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुसऱया डावात 4 गडय़ांच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. गब्बाची खेळपट्टी फलंदाजीपेक्षा गोलंदाजीला अधिक अनुकूल असल्याचे दिसून आले. या खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षित उसळत होता. तथापि ही खेळपट्टी साधारण असल्याचे मत आयसीसीचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन व्यक्त केले आहे. आयसीसीच्या नियमावलीनुसार गब्बाचे मैदान सरासरी इतर मैदानांच्या तुलनेत साधारण असल्याचे सांगण्यात आले. सामनाधिकारी रिचर्डसन यांचा हा अहवाल क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे दाखल झाला आहे. आता उभय संघातील दुसरी कसोटी मेलबर्नच्या मैदानावर 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. उभय संघामध्ये तीन सामन्यांची ही कसोटी मालिका होत आहे.









