कडोली-बेळगाव रस्त्यावरील परिस्थिती
बेळगाव : कडोली-बेळगाव येथील मुख्य रस्त्यावर आता खड्डा पडण्यास सुरुवात झाली आहे. अलतगा क्रॉस येथे भयावह खड्डा पडला असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक आहे. तेंव्हा तातडीने या ठिकाणचे खड्डा बुजावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे. खड्डा जीवघेणा, कोणीच लक्ष देईना अशी अवस्था आता निर्माण झाली आहे. बेळगाव, अलतगा रस्त्यावरुन मोठ्याप्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. अलतगा येथील क्रॉर्नरवर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता अधिक आहे. याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान या रस्त्यावरुन अलतगा, अगसगे, हंदिगनूर, चलवेनहट्टी, कुरिहाळ, कडोली, बंबरगा, देवगिरी, जाफरवाडी आदी गावातील नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, खडीचे अवजड टिप्पर या ठिकाणांहून ये-जा करत असल्यामुळे हा रस्ता खराब होत चालला आहे. सध्या कॉर्नरवर मोठा खड्डा पडला असून त्यामध्ये अपघात घडत आहेत. परिणामी रस्ता रुतला आहे. त्यामध्येच खड्डा पडला आहे. याचा फटका प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









