अशोक गेहलोत यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ जयपूर
सचिन पायलट हे आता स्वत:चे हायकमांड झाले आहेत, त्यांनी मी काय सांगू शकतो असे विधान करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी सरदारशहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सुदैवी ठरू. माझ्या विरोधात त्या उभ्या राहिल्यास आम्हा दोघांची देशभरात चर्चा होईल असा दावा गेहलोत यांनी केला आहे.
सचिन पायलट हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, आता ते स्वत:च हायकमांड ठरले आहेत. हायकमांडला काही सांगण्याची गरज भासत नाही. हायकमांड स्वत:च तिकीटवाटप करतात आणि तिकीटवाटपात पायलट यांची देखील भूमिका असेल. पायलट हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीत सामील झाले आहेत. या समितीचे सदस्य हे हायकमांडशी संबंधित नेते ठरतात, असे वक्तव्य गेहलोत यांनी केले आहे.
काँग्रेसच्या आमदारांबद्दल नाराजी असल्याचा फीडबॅक दीर्घकाळापासून प्राप्त होत आहे. आम्ही आमदारांशी संपर्क ठेवून असतो. एखादी समस्या उद्भवली असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा चांगले काम करून देखील राजकारणात पर्सेप्शन चुकीचे तयार होते असा दावा गेहलोत यांनी केला आहे.









