वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या चांद्रयान-3 अभियानाअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरण केलेल्या ‘विक्रम’ या अवतरण वाहनाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. नासाच्या एलआरओ या चंद्राभोवती परिभ्रमण करणाऱ्या यानाने हे छायाचित्र काढले होते.
23 ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी विक्रमने चंद्रावर यशस्वी अवतरण केले होते. त्यानंतर त्याच्या आतील ‘प्रज्ञान’ नामक चांद्रबग्गी (रोव्हर) बाहेर आली होती आणि तिने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन महत्वाची माहिती संकलित केली. त्या माहितीवर प्रक्रिया करुन भारतात पाठविण्यात आली होती. चंद्रावर गंधक हे संयुग आहे, हा महत्वाचा शोध त्यामुळे लागला होता.
600 किलोमीटरवरून छायाचित्र
नासाच्या यानाने विक्रमचे छायाचित्र 600 किलोमीटर अंतरावरून काढले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक विक्रम स्थिर स्थितीत आहे. सध्या त्याला आणि प्रज्ञान या चांद्रबग्गीला (रोव्हर) निष्क्रीय करण्यात आले आहे. चंद्राच्या या भागावर पुन्हा सूर्यप्रकाश 22 सप्टेंबरपासून येणार आहे. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर भारतातून नियंत्रण ठेवण्यात येते. या छायाचित्रात विक्रम हा त्याच्या चारही आधारांवर चंद्राच्या पृष्ठभागांवर सुयोग्यरित्या उभा असलेला दिसून येतो. नासानेही यासंबंधी इस्रोची प्रशंसा केली आहे.









