ऑनलाईन टीम / पुणे :
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी शिताफीने तासाभरातच अटक केली.
अमोल महादेव वाघ (वय 33, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोलने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सहाय्यता नंबरवर फोन केला. पुणे व अहमदनगर येथे सहा व्यक्ती प्रत्येकी तीन ठिकाणी बॉम्बस्फोट करणार आहेत. त्यांच्या जवळ मशीनगन आणि आरडीएक्स आहे, असे सांगितले. पोलिसांना दोन फोन नंबर देत हे दोघे एनडीएमध्ये स्फोट घडविणार असल्याचेही सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ एनडीए गाठले. एनडीएच्या यंत्रणेला अलर्ट करुन तपासाची सूत्रे फिरवली. पोलिसांच्या तांत्रिक विभागाने फोन कॉल ट्रेस केला अन् अवघ्या तासाभरातच धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. घरगुती त्रासाला कंटाळून दारुच्या नशेत संबंधिताने हा फोन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. उत्तमनगर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









