काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा
बेळगाव : आपल्यावर व आपल्या सरकारवर खोट्या आरोपांची मालिकाच चालवण्यात आली. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आले. हे सर्व खटाटोप बाजूला ठेवत राज्यातील जनतेने आमचा हात धरला आहे. जनता आजही आमच्या बाजूने आहे उद्याही आमच्याच बाजूने राहणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बोलून दाखवला. एका खासगी रिसॉर्टमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती, आकडेवारी घराघरापर्यंत पोचवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना केले. विकासाचे पर्व सुरूच राहणार आहे. विधिमंडळाने व विधिमंडळाबाहेरही छातीठोकपणे विकासाचे मुद्दे मांडा. लोकांना सत्याची जाणीव करून द्या, असे आवाहन केले.
वक्फचा मुद्दा आता भाजपवरच उलटला आहे. भाजपच्या राजवटीतच अधिकाधिक नोटिसा देण्यात आल्या आहेत. बी. एस. येडियुराप्पा, बसवराज बोम्माई मुख्यमंत्री असताना वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्याचा भाजपला अधिकार नाही. जमीर अहमद यांनी विधान परिषदेत समर्थपणे उत्तर दिले आहे. काँग्रेसवर आरोप करणाऱ्या भाजप नेते सत्तेवर असताना प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. पुढील वर्षापासून राज्याचे आर्थिक क्षमता आणखी वाढणार आहे. त्यामुळे विकासाचा वेगही वाढणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील आमदारांना पुरेशी निधी देण्यात येणार आहे. एकूण 2 हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते व आमदार उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला.









