वाळपई ; वाळपई, पर्ये मतदारसंघात भाजपचे काम प्रामाणिक स्तरावर सुरू आहे. पक्षाची गद्दारी करणाऱ्याच्या विरोधात पक्षाने कारवाई करावी. अन्यथा पक्षाचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. विकासाच्या स्तरावर या दोन्ही मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. अनेक गोष्टी साध्य व्हायच्या आहेत, मात्र त्यासाठी थोडीशी कळ सोसा. भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या धर्तीवर चालणारा पक्ष आहे. केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत चांगल्या प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये अनेक स्तरावर विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. येणाऱ्या काळातही अनेक प्रकल्पाचे काम निश्चितच सुऊ होणार आहे, अशी माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत सत्तरी तालुक्मयातील एकूण पाच स्वतंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते. बाळकृष्ण सावंत, लाडको यशवंत पालकर, भैरो वरक, गणेश यशवंत आईकर, गणेश हरवलकर यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पर्ये मतदार संघाचे आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे, नगराध्यक्ष सेहझीन शेख, जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, राजश्री काळे, देवयानी गावस, उमाकांत गावडे,पक्षाचे संघटक विनोद शिंदे व इतरांची उपस्थिती होती.
गोवा मुक्ती नंतर पहिल्यांदाच विकासाचा पाया मजबूत व्हायला सुऊवात झालेली आहे. यामुळे सर्व नागरिकांनी एकजुटीतून सत्तरीच्या विकासाला चालना द्यावी अशी विनंती राणे यांनी केली आहे. आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत वाळपईत आयोजित केलेल्या सर्व पंचायत, नगरपालिका, पंच सदस्य, सरपंच नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य, बूथ समितीचे कार्यकर्ते यांच्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी अनेक विषयाची टिप्पणी केली. सध्या तरी वाळपई नगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 25 कोटीचे प्रकल्प सुरू आहेत. येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्मयातील केरी, होंडा ,उसगाव या भागांमध्ये विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे आढळलेली आहेत ती लवकरात मार्गी लागतील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. गणेश चतुर्थी पूर्वी सर्व भागांमध्ये कोपरा बैठकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संवादाची यात्रा सुरू करणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये असे आवाहन त्यांनी केले. व्याघ्रक्षेत्र प्रकल्पासंदर्भात बोलताना राणे यांनी सांगितले की कायदेशीर लढाई लढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही. काही लोक सत्तरी तालुक्मयातील नागरिकांची गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले. यावेळी दोन्ही मतदारसंघातर्फे मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत मतदार संघाचा कलश संबंधित आमदारांकडे पंचायतीच्या सरपंचाकडून सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले.









