प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात कट्टावासियांचे पांडुरंग चरणी साकडे
कट्टा / वार्ताहर
संपूर्ण महाराष्ट्रावर कृपादृष्टी असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत कट्टा बाजारपेठ येथे आकर्षक, भव्य दिव्य, मनमोहक, डोळ्याचे पारणे फिटावे असे मंदिर उभारण्यात आले. अनेक भक्ताच्या म्हणण्यानुसार पंढरपूर नंतर पांडुरंगाचे असे भव्य दिव्य मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेतील आहे.याच विठ्ठल रखुमाई व श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कट्टावासियांनी पांडुरंगाच्या चरणी आमचा कट्टा गावात सुख – समृद्धी, शांती आनंदी – आनंद नांदू दे असे साकडे घातले.
यानिमित्ताने दोन दिवस भरगच्च असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोमवार 10 मार्च रोजी विठ्ठल रखुमाई व इतर देवता यांना पुरोहितांच्या मंत्र उच्चारात शाही स्नान घालण्यात आले. तसेच इतर धार्मिक विधी करण्यात आले. यानंतर दिवसभरात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांचे अनुभव संकीर्तन, हळदीकुंकू समारंभ, पुणे येथील श्रुती टेकावडे, ईशा जोगळेकर, जुई सक्सेना यांचे नृत्यसंध्या (भरतनाट्यम), देवगड किंजवडे येथील पावणादेवी समई नृत्य महिला मंडळ यांचे समईनृत्य, सुप्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर यांचे सुश्राव्य भजन व इतर स्थानिक भजने असे कार्यक्रम करण्यात आले. तर मंगळवार 11 मार्च रोजी श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी विठ्ठल रखुमाई प्रतिकृती साकारलेली आकर्षक भव्य दिंडी सोहळा हा साऱ्या कट्टावासियांचे लक्ष वेधून घेत होता. यानंतर कणकवली येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा रविकांत राणे यांचे सुश्राव्य भजन व रात्रौ जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ दांडेली, आरोस सावंतवाडी यांचा नारायणी नमोस्तुते हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने व आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच संपूर्ण कट्टा बाजारपेठेला रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमामुळे कट्टा गावात भक्तिमय वातावरणात तयार झाले होते त्यामुळे गावाला प्रतिपंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. बाजारपेठेत येणार प्रत्येक व्यक्ती अगदी भक्तिभावाने पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होताना दिसत होता.
छाया : विशाल वाईरकर









