जिनपिंग यांच्या पक्षाबद्दल निष्ठा निर्माण करण्याचा उद्देश
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनकडून आता देशभक्ती शिक्षणाला चालना देण्यात येत आहे. याकरता तेथील सरकारने देशभक्ती शिक्षण कायदा संमत करविला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चिनी युवांदरम्यान राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि कम्युनिस्ट पक्षाबद्दल निष्ठा निर्माण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
हा कायदा शाळा, महाविद्यालयात देशभक्तीशी निगडित गोष्टी शिकविण्याची कायदेशीर हमी देतो. काही लोकांना देशभक्तीचा विसर पडत असल्याने त्यांना याबद्दल जागरुक करण्याची गरज असल्याचे सरकारकडून म्हटले गेले आहे. चीनमध्ये हा कायदा 1 जानेवारीपासून लागू होणार आहे.
हिस्टॉरिकल नाइलीज्म (ऐतिहासिक शून्यवाद) यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या कायद्याची गरज होती असे सरकारचे म्हणणे आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षावरील लोकांचा विश्वास डळमळीत होऊ लागल्यावर किंवा पक्षाच्या क्षमतेबद्दल संशय निर्माण झाल्यास हिस्टोरिकल नाइलीज्म अशी संज्ञा वापरण्यात येते.
सरकारने देशभक्तीला चालना देण्यासोबत तर्कसंगत, समावेशक आणि खुल्या विचारांचा हा कायदा आहे. हा देशाला जगाशी जोडणारा आणि इतर संस्कृतींना स्वीकारण्याच्या आवश्यकतेवर जोर देणारा हा कायदा आहे. कायद्यानुसार देशभक्तीचे शिक्षण अन्य देशांचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान होईल आणि मानवी संस्कृतीच्या सर्व कामगिरींनी हा कायदा प्रेरित असल्याचा दावा सरकारने केला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये चोसन मीडिया ग्रूपने दक्षिण कोरियातील एका अशा रेस्टॉरंटचा खुलासा केला होता, जेथे क्षी जिनपिंग यांच्या विचारसरणीचा प्रचार केला जात होता. हे चिनी रेस्टॉरंट दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये 2017 पासून चालविले जात होते. रेस्टॉरंटच्या नावाखाली चीन विदेशात क्षी जिनपिंग आणि त्यांच्या सरकारचा प्रचार करण्याचे काम करत होता. रेस्टॉरंटमध्ये जिनपिंग यांच्या विचारसरणीशी निगडित अनेक पुस्तके देखील ठेवण्यात आली होती.









