एक विनोदी चुटका असा आहे… दहावीच्या परीक्षेत गणित या विषयात नापास झालेली दोन मुले तलावाकाठी आत्महत्या करायला गेली. काठावर उभे राहून ती उडी मारणार इतक्यात त्यातील एक मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, ‘अरे, आज तर आपण मरून जाऊ; परंतु नऊ महिन्यांनी जर तान्हे बाळ म्हणून पुन्हा जन्माला आलो तर?’ मित्र म्हणाला, ‘खरंच रे! असं झालं तर तीन वर्षाच्या आतच पुन्हा शाळेत जावं लागेल. परत तोच अभ्यास, तीच परीक्षा आणि तीच आई-बाबांची भुणभुण. त्यापेक्षा गणिताचा अभ्यास करून परीक्षा दिलेली बरी.!’
नंतर ती मुले हातात हात घालून हसत मजेत घरी आली. शिक्षणाचा धाक आणि नासलेलं बालपण हे सुचवणारा हा लहानसा परंतु अंतर्मुख करणारा चुटका आहे. भूतकाळात रमायची, जुन्या आठवणी काढून ते दिवस जगण्याची माणसाला आवड असते. परंतु एखाद्या व्यक्तीला आयुष्यातील काही वर्षांचा पुन्हा उपभोग घेता यावा म्हणून परमेश्वराने वयाने परत लहान केले तर चालेल का त्याला? माणसाला असे विचारले तर माणूस निक्षून ‘नको’ असे म्हणतो. जगताना जीवनाची काही पाने सोनेरी असली तरी ते दिवस परत परत उपभोगावे असे न वाटता ते हृदयाशी जपून ठेवावे असेच वाटते. कां? कारण निसर्गत: माणसाला क्रममुक्ती हवी असते. काळाच्या मागे राहणे किंवा मागे जाणे म्हणजे क्रमसंकोच होतो. पुढे पुढे जाण्याची माणसाला ओढ असते. उत्सुकता व कुतूहलही असते. निसर्गाचे अनेक चमत्कार माणूस बघत असतो. छोट्याशा रोपाला भलं मोठं फूल येतं.
एकदा असंच झालं. निसर्गाचा चमत्कार असा झाला की एका छोट्या जास्वंदाच्या झाडाला खूप मोठे असे सुंदर फूल आले. वाटले, एवढ्याशा रोपात किती मोठी क्षमता दडली आहे. परंतु काही दिवसांनी मात्र रोप हळूहळू रोडावले. पाने कातरली. जवळ जाऊन बघितले तर काय, एक छोटी पानाच्या रंगाची हिरवी अळी रोपावर ठाण मांडून बसली होती. त्या चिमुकल्या झाडाचा रस शोषून घेत होती. ती अळी झाडाचा एक भाग होऊन त्याच्यासारखे रंगरूप घेत हळूहळू स्वत:चे अस्तित्व सिद्ध करीत होती. लक्षात येताच ती अळी काढून फेकली. झाडाची खूप काळजी घेतली, पण काही दिवसांतच रोपाने मान टाकली आणि ते मातीत मिसळून गेले. ते छोटेसे रोप जगण्याची गोष्ट सांगून गेले.
पिंडी ते ब्रह्मांडी असे अध्यात्म सांगते. ब्रह्मदेवाने स्वत:च्या आत्म्यापासून विश्वसृजनाला प्रारंभ केला आणि हळूहळू एक एक दिशा, एकेक गोष्टींची निर्मिती केली. सजीव, समजीव, निर्जीव असे अनेक जीव जन्माला घातले. त्या सर्वांना चैतन्याचा स्पर्श दिला. उत्पत्ती, स्थिती, लय अशी त्यांची व्यवस्थाही लावून दिली. कोट्यावधी जीव जन्माला घालूनही ब्रह्मदेवाचे समाधान काही होत नव्हते. शेवटी त्याने काही काळ साधना केली आणि निर्माण केलेल्या अनंत वस्तूंचा संकलित सूक्ष्म परमाणू काढून अनेक परमाणूंचे एकत्रीकरण केले. त्यातून नवा आकार निर्माण झाला. तो म्हणजे मानव. विश्वात भरून असलेल्या असंख्य जिवांचा, वस्तूंचा परमाणू माणसाच्या देहात आहे. माणसाचा देह म्हणजे विश्वदर्शन आहे. विश्वात सामावलेले सारे सामर्थ्य, ज्ञान, तेज मानवी देहात भरलेले आहे. मी कोण याचे ज्ञान म्हणूनच माणसाला होऊ शकते. परंतु तो स्वत:ची ओळख विसरून विनाउद्देश इकडेतिकडे भटकतो आणि शेवटी लयाला जातो. निसर्गाने असीम शक्ती बहाल केलेले एक जास्वंदाचे इवलेसे रोप सांगून गेले की फुलण्याची अमर्याद क्षमता असली तरी एखादा कुविचार, एखादा किडलेला समाज, एखादी तनामनाला व्यापून असलेली छळवादी, आसुरी व्यक्ती त्या रोप पोखरणाऱ्या अळीसारखी असते. ती स्वभाव, रंगरूप यांचे इतके बेमालूम सोंग वठवते की माणूस त्याला आपला अवयव समजूनच धारण करतो आणि हळूहळू संपत जातो. त्याचा जन्म अक्षरश: वाया जातो.
माणसाने कधीतरी डोळे मिटून बसावे आणि आयुष्याचा चित्रपट बघावा. कसे होतो? कुठे आलो? कसे घडलो? कितीतरी न मोजता येण्यासारख्या घटना जीवनात घडल्या. स्थित्यंतरे झाली. पुष्कळ माणसे सहवासात आली आणि जीवनाचे बारीक-सारीक तपशील घेऊन नाहीशी झाली. काही घटना मात्र खोलवर रुतून बसल्या. रुजल्या. त्यांना समवेत घेऊन आयुष्य पुढे गेले. चांगल्या गोष्टी, संस्कारांची रुजवण होऊन आयुष्य उन्नत झाले तर नको असलेल्या काटेरी झुडपांसारख्या गोष्टी जीवनभर ओरखडे उमटवीत बसल्या. त्यामुळे जगणे बोन्साय झाले. आकाशाशी मैत्री करायचे सामर्थ्य असूनही एका लहानशा वर्तुळात ठेंगणे झाले. फुलले, फळले आणि संपूनही गेले.
माणूस हा सृष्टीचाच एक भाग आहे आणि बदल हा सृष्टीचा स्वभाव आहे. माणसाच्या जगण्यात अधिक टप्पे येतात. वाटा वळणे बदलतात. माणसे येतात, जातात. संवादाची साधने काळाप्रमाणे बदलतात. बाहेरच्या जगात जेवढा बदल घडतो तेवढाच आतल्याही जगात घडतो. मनात तर अनेक गावे वस्तीला असतात. बालपणीचे गाव निराळे तर तरुणपणातील हवेतील वस्ती आगळीच. मध्यमवयातील स्थैर्य शहरासारखे, तर वृद्धपणीचा हळवा, काहीसा परावलंबी गावाचा परिसर वेगळा. दरवेळी नवी माणसे, नवे चेहरे, मनाचा स्वभाव असा की गाव बदलले तरी माणसांची गर्दी कमी होत नाही. जखमा बुजत नाहीत. मनातले गाव कधीच का ओस पडत नाही? महामार्गाच्या वाटेवर चालताना नवी क्षितिजे त्यांना खुणावत नाहीत का? जुने सारे बरोबर घेऊन जाण्याचा अट्टाहास माणसाचा का असतो कोण जाणे! मन रिकामे होतच नाही. त्याचे ओझे घेऊन वाट चालताना पुन्हा मागे जावे असे वाटत नाही आणि ओझेही फेकून देता येत नाही. श्वास अडकतो इथेतिथे. माणूस मात्र चालत राहतो.
एकदा एका विस्मृती झालेल्या वृद्ध बाईंना भेटण्याचा योग आला. त्यांच्या सूनबाईंनी सांगितले की त्यांना भ्रम झाला आहे. त्या शरीराने जरी इथे असल्या तरी मनाने त्यांच्या माहेरी नांदत आहेत. त्या आजींचे माहेर खूप दूर होते आणि म्हटले तर आता मायेचे माणूसही कुणीच नव्हते. तरी त्यांच्या मनामध्ये माहेरची माणसे साजिवंत झाली होती. त्या जुन्या आठवणी, रस्ते, दुकाने, माणसे सगळं अनुभवत होत्या. त्या साठ वर्षे जुन्या झालेल्या आपल्या माहेरघराला आठवीत होत्या. ते घर त्यांच्या मनाच्या माजघरात जिवंत होते. वाटले, वय वाढले, आयुष्य पुढे गेले, बहुतांशी माणसे-सुना, नातवंडे, पतवंडे वाढतच गेलीत. पण मन मात्र त्या गावातच घुटमळत राहिले आणि शेवटी तिथेच विसावले.
‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकेका गोष्टीची समाप्ती करा’ असे अध्यात्म उगीच सांगत नाही. संत श्री बाबामहाराज आर्वीकर म्हणत की तुम्ही कर्म पूर्ण करा आणि मग सोडून द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हणतात,
‘परि आदरिले कर्म दैवे ।
जरी समाप्तीते पावे ।
तरी विशेषे तेथे तोषावे ।
हेही नको ?’
कर्म जरी पूर्ण होऊन समाप्त झाले तरी त्याचा विशेष आनंद करू नये. कारण माणसाचे जीवन हे एका शक्तीने चालते. समर्थांनी म्हटले आहे, ‘मी कर्ता म्हणसी तरी दु:खी होसी । आणि राम कर्ता म्हणसी तरी पावसी यश-कीर्ती-प्रताप.’ जगाला चालवणाऱ्या त्या शक्तीला शरण गेले की क्रममुक्ती आपोआपच सहजसाध्य आणि सुंदर होते असा अनेकांचा अनुभवच आहे.
–स्नेहा शिनखेडे








