दापोली / मनोज पवार :
फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. यावर सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनीही आक्षेप घेतला असला तरी आता वित्त विभागाने नकारघंटा दिल्याने फणस संशोधन केंद्र दापोली तालुक्यातील वाकवली येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देश आणि परदेशातील फणस जातींचा अभ्यास करणे, वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास, फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी, तयार फणसाची भाजी, फणस पल्प व त्यापासून उत्पादने, ताज्या तसेच उकडलेल्या बिया व त्याची पावडर, वर्षभर फणसाचे उत्पादन, फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे, पडीक जमिनीवर लागवड करणे, रोग, किडी, शाखीय व्यवस्थापन यासाठी संशोधन करणे, शेतकऱ्यांना रोपवाटिका, उत्पादन पद्धती तसेच प्रक्रिया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबवणे, यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
फणसाला भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे असताना घेण्यात आला होता. यासाठी 40 कोटींचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला होता. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात होती. मात्र वित्त विभागाच्या नकारघंटेनंतर लांजा येथील प्रस्तावित संशोधन केंद्राचा प्रस्ताव गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.
कोकणात फणस मुबलक प्रमाणात मिळत असून हे फळ पौष्टिक, आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळपीक आहे. या फळाचे मूल्यवर्धन केल्यास त्याची मूल्यसाखळी निर्माण होऊ शकते. तसेच त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते. यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. मात्र कोकणात फणसासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याचा अभिप्राय वित्त आणि नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे कोकणात फणस उद्योगाला चालना देण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वतंत्र फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याऐवजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एक संशोधन केंद्र चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठात स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना या विद्यापीठास देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कृषी विद्यापीठाकडून कार्यवाही चालू असल्याचे कृषीमंत्री अधिवक्ता माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले. यामुळे लांजा येथे होणारे फणस संशोधन केंद्र आता दापोली तालुक्यातील वाकवली येथील प्रादेशिक संशोधन केंद्रात होणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
- आम्ही आमची जागाही देण्यास तयार आहोत…
देशातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी जी फणसावर काम करते, ती लांजात आहे. कोकण कृषी विद्यापीठ जर लांजात घेण्यास तयार नसेल तर सरकारने इतर राज्यांसारखे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडेलवर हे रिसर्च सेंटर जॅकफ्रुट अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत करावे. आम्ही आमची जागाही देण्यास तयार आहोत. शासनाने फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, प्लांट व मशिनरी तसेच अॅडमिनीस्ट्रेटिव्ह बिल्डिंगवर खर्च करावा. ज्याचा अंदाजित खर्च 20 कोटी आहे. तसेच ऑपरेशन्स, सॅलरीज, रिपेअर अँड मेन्टेनन्स इत्यादी सगळा खर्च शेतकरी उत्पादक कंपनी करण्यास तयार आहे. त्यामुळे शासनाच्या दरवर्षी होणाऱ्या खर्चाची बचत होईल. आमदार सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, सतेज ऊर्फ बंटी पाटील तसेच कायमच या रिसर्च सेंटरसाठी सकारात्मक असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेही आभार लांजातील फणस व्यावसायिक मिथिलेश देसाई यांनी मानले आहेत.








