फलटण :
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात आळंदी येथून प्रस्थान झाले. माऊलींचे प्रस्थान झाले असूनही फलटण शहरातील पालखी मार्ग अद्यापही बिकट अवस्थेत आहे. शहरातील संपूर्ण पालखी मार्गावर खड्यांचे साम्राज्य आहे. मंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांनी पाहणी करून देखील शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अवस्था अतिशय दयनीय आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी देखणे, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागरजन यांनी पालखी मार्ग व पालखी तळाची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्री गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी प्रस्थानाच्या आतमध्ये शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते.
मात्र, आजही शहरातील पालखी मार्ग खड्यातच असून सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत असल्याचे दिसून येते. पालखी मार्ग हा बहुतांश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित आहे; परंतु या विभागातील अधिकारी मात्र अन्य विषयात मग्न असल्याच्या चर्चा यानिमित्ताने सुरु झाल्या आहेत.
- सचिन ढोलेंची उणीव
मागील वर्षी फलटणचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले कार्यरत होते. सचिन ढोले हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी पालखी काळामध्ये वारीचे नेटके नियोजन केल्याचे अनुभवायला मिळाले होते. गत काही महिन्यांपूर्वी सचिन ढोले यांची बदली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात झाली होती. त्यानंतर पदोन्नतीने मुंबई उपनगर विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. सध्या ते नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (NMRDA) सह आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. यंदाच्या वर्षी सचिन ढोले यांच्यासारख्या अधिकाऱ्याची उणीव भासत असल्याचे बोलले जात आहे.








