संबंधित खात्याने त्वरित बुजविण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील अरगन तलाव, गणेश मंदिरानजीक मुख्य रस्त्यालगत पाणी जाण्यासाठी सोडलेली चर म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. सदर चरित दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन अपघात घडले आहेत. सध्या घडत आहेत. सदर चरीत पाणी जाण्यासाठी पाईप घालून ती बुजवावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. अन्यथा मोठा अनर्थ सदर चरीमुळे घडू शकतो. यासाठी संबंधित खात्याने जागरूकपणे ही चर बुजवावी, अशी मागणी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील महात्मा गांधी चौकपासून 200 फुटांच्या अंतरावर रस्त्याच्या काठोकाठ ही चर आहे. या रस्त्याच्या बाजूला साचणारे पाणी याचबरोबर मिलिटरीच्या हद्दीतील तलाव भरण्यासाठी ऊन्हाळ्यामध्ये पाणी सोडले जाते. यासाठी सदर रस्त्याच्या खाली पाईप घातला असून, रस्त्याच्या काठोकाठ हा पाईप संपतो. परिणामी एखादे वाहन अंधारात किंवा दिवसाढवळ्या जरी बाजूला गेले तर ते बरोबर त्या चरीत जाऊन अडकून मोठा अपघात होण्याची संभावना आहे. यासाठी सदर चरीजवळ पोल उभा करून त्याला लाल कापड लावले आहे. मात्र सदर पोल नेहमीच अनेकवेळा वाहनांच्या धक्क्याने बाजूला पडलेला असतो. तरी संबंधित खात्याने तातडीने या चरीच्या पुढील भागात पुन्हा पाईप घालून ती चर बुजवावी, अशी मागणी होत आहे.









